Solar Panel Price : अलीकडे वाढीव विजबिलामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. विजेचे दर सातत्याने वाढत असल्याने आता अनेकजण सोलर पॅनल बसवू इच्छित आहेत. सोलर पॅनलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
शासन देखील सोलर पॅनल बसवण्यासाठी आता सर्वसामान्यांना अनुदान पुरवत आहे. सोलर पॅनलसाठी अनुदान देणे हेतू केंद्र शासनाने नुकतेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे.
आधी या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्योदय योजना म्हणून संबोधले होते. मात्र नंतर या योजनेचे नामकरण पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे करण्यात आले आहे. या योजनेचे पोर्टल देखील सुरू झाले आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल पुरवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांना महिन्याकाठी 300 युनिट पर्यंतची वीज मोफत मिळू शकणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र शासन किती अनुदान देणार आणि ग्राहकांना किती खर्च करावा लागू शकतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च करावा लागेल ?
अनुदानाशिवाय सौर यंत्रणा बसवण्यासाठी नागरिकांना जास्त रक्कम मोजावी लागते. उदाहरणार्थ, 2 किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवण्यासाठी 1.25 लाख रुपये खर्च येतो. तसेच 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवण्यासाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च येतो.
मात्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेतल्यास दोन किलो वॅट चे सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना 90 हजार रुपयांपर्यंत आणि तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी एक लाख 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो.
शासनाकडून किती सबसिडी मिळते
सोलर पॅनल बसवण्यासाठी पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत नागरिकांना 1 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
नागरिकांना 2 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी 60 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट क्षमतेच्या सौर पॅनेलच्या खरेदीवर नागरिकांना 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.