Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याची शेती राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात होते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्यप्रदेशनंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यात देशातील एकूण उत्पादनाच्या 45 टक्के एवढे उत्पादन होते तर महाराष्ट्रात एकूण उत्पादनाच्या 40% एवढे उत्पादन होते. अर्थातच मध्यप्रदेश आणि आपले महाराष्ट्र हे दोन्ही राज्य सोयाबीन उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. यंदा मात्र या दोन्ही राज्यात अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने सोयाबीनचे उत्पादन प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.
जून महिन्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली शिवाय जूनमध्ये पावसाचा जोर वाढलाच नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना जून महिन्यात सोयाबीनची पेरणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केली तर काही शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली आहे. आता याच शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी परतीच्या पावसाबाबत महत्त्वाची अशी माहिती दिली असून परतीचा पाऊस यंदा सोयाबीन कापणीच्या हंगामात येईल असा दावा देखील त्यांनी केला आहे.
खुळे यांनी 27 सप्टेंबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल असा अंदाज बांधला होता. मात्र प्रत्यक्षात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला 25 सप्टेंबरलाच सुरवात झाली आहे. सध्या स्थितीला मान्सूनचा परतीचा प्रवास हा राजस्थान मधून होत आहे. आगामी काही दिवसात आपल्या महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरणार आहे.
खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे 10 ऑक्टोबरच्या सुमारास आपल्या राज्यातून मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात होईल. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन पेरणी केली असेल अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन या कालावधीत काढणीसाठी येणार आहेत. यामुळे या सोयाबीनची कापणी प्रभावित होण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे सोयाबीनच्या दाण्यांवर बुरशी येऊ शकते आणि कापणीस उशीर होऊ शकतो असे सांगितले जात आहे. तसेच खुळे यांनी परतीचा पाऊस 24 तासातही निघून जाऊ शकतो किंवा मग दहा दिवसांपर्यंत मुक्काम ठोकू शकतो असे देखील सांगितले आहे. यामुळे आता परतीचा पाऊस महाराष्ट्रात केव्हा आणि कसा बरसतो हे पाहणे विशेष खास राहणार आहे.