Soybean Market Price : दिवाळीनंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दबावात असलेले सोयाबीन बाजार भाव आता पुन्हा एकदा कडाडले आहेत.
जवळपास एका वर्षापासून हमीभावाच्या आसपास विक्री होणारे सोयाबीन आता सहा हजार रुपये प्रति क्विंटल च्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत आहे.
खरंतर महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत होता. विशेष म्हणजे गेल्या हंगामापासून सोयाबीनचे दर दबावात होते. मध्यंतरी तर सोयाबीनला चार हजारापेक्षा कमीचा भाव मिळाला होता.
दिवाळीपूर्वी देखील राज्यातील अनेक बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत होता. त्यामुळे पिवळं सोन यंदा शेतकऱ्यांना रडवणार की काय अशा चर्चा पाहायला मिळत होत्या.
बाजारात अशीच परिस्थिती आगामी काही महिने सुरू राहिली तर यंदा पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही असे मत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात होते.
मात्र दिवाळीनंतर सुरू झालेल्या लिलावात सोयाबीन बाजारभावात मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. आता बाजारात पुन्हा एकदा पिवळं सोनं तेजीत आला आहे. भाववाढीचा हा ट्रेंड गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
विशेष बाब अशी की आज राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनचे कमाल भाव 5300 रुपये प्रति क्विंटल च्या पार गेले आहेत. विशेष असे की सोयाबीनचे सरासरी बाजार भाव देखील 5000 रुपये प्रति क्विंटल च्या पार गेले आहेत.
म्हणजेच बाजारभावात झालेली ही वाढ एका मार्केटमध्ये झालेली नसून सर्वत्र भाववाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने आता लवकरच सोयाबीन सहा हजाराचा टप्पा गाठेल अशी भोळी-भाबडी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
एकंदरीत भाव वाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात सुधारणा होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
कुठे मिळाला विक्रमी दर
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मंगळूरूपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज 1639 क्विंटल एवढी पिवळा सोयाबीन आवक झाली होती.
17 नोव्हेंबर 2023 रोजी या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4700 प्रतिक्विंटल, कमाल 5400 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.