Spicejet Airlines : येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे तयार होत असलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यामुळे गेल्या अनेक दशकांचा राम भक्तांचा संघर्ष खऱ्या अर्थाने यशस्वी ठरणार आहे. श्रीराम जन्मभूमीवरून सुप्रीम कोर्टात गेली अनेक वर्ष सुनावणी सुरू होती.
दरम्यान या सुनावणीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने जन्मभूमीबाबत प्रभू रामललाच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर मग तिथे भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली. आता मंदिराचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर या मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर अयोध्या येथील राम मंदिर राम भक्तांना दर्शन करणे हेतू खुले होणार आहे.
यामुळे अयोध्या येथे आता प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता इंडिगो आणि एअर इंडिया या एअरलाइन्स कंपन्यांनी अयोध्येसाठी देशातील वेगवेगळ्या शहरातून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे मुंबईहूनही अयोध्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. 15 जानेवारीपासून ही विमान सेवा सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. अशातच आता स्पाइसजेट ही कंपनी देखील अयोध्यासाठी विमानसेवा सुरू करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
म्हणजेच आता आयोध्येसाठी विमान सेवा सुरू करणारी स्पाइस जेट ही तिसरी कंपनी बनू शकते. याव्यतिरिक्त स्पाइसजेटने लक्षद्वीपसाठी देखील विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती दिलेली आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली.
यानंतर त्यांनी लक्षद्वीपचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेत. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. अनेक भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीपची मालदीव सोबत तुलना केली, काहींनी लक्षद्वीप हे मालदीव पेक्षा भारी असल्याचे म्हटले.
मात्र या साऱ्यांची मळमळ मालदीव मधील काही मंत्र्यांना झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्षद्वीप वर अभद्र भाषेचा वापर केला. मग काय भारतीय पर्यटकांनी मालदीवचा खरपून समाचार घेतला. सोशल मीडियावर मालदीव वर शाब्दिक पलटवार सुरू झाला.
एवढेच नाही तर भारतीय पर्यटकांनी मालदीव साठीची ट्रिप सुद्धा रद्द केली. संपूर्ण देश मालदिव विरोधात एकवटला आहे. यामुळे आता लक्षद्वीपकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
दरम्यान अनेक कंपन्यांनी लक्षद्वीपसाठी विमान सेवा पुरवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये स्पाईसजेट कंपनीने देखील लवकरच लक्षद्वीप साठी विमानसेवा सुरू होणार अशी माहिती दिली आहे.