State Employee News : जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सरकारी नोकरदार म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. राज्य सरकारने नुकताच राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये म्हणजेच प्रमोशन मध्ये आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
खरंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या प्रत्येकालाच पदोन्नतीची आस लागलेली असते. आपल्यालाही प्रमोशन मिळायला हवे अशी कर्मचाऱ्यांची इच्छा असते. दरम्यान राज्य सरकारने राज्यातील काही निवडक कर्मचाऱ्यांना आता पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा शासन निर्णय काल अर्थातच 29 जुलै 2024 ला निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण दिले जाणार आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे हा निर्णय 30 जून 2016 पासून लागू राहणार आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिले जाणारे चार टक्के आरक्षण हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू केले जाणार आहे.
20 एप्रिल 2023 रोजी जारी झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीचे अधीन राहून 30 जुन 2016 पासून काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.
काल जारी झालेल्या या शासन निर्णयानुसार, 30 जुन 2016 पासून ज्या तारखेला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या तारखेपासून संबंधित पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक रित्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.
मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ हा पदभार स्वीकारण्याचा दिनांकापासूनच मिळणार आहे. यामुळे या संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरंतर हा निर्णय नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र याबाबतचा जीआर म्हणजे शासन निर्णय काल निघाला आहे. यामुळे संबंधित नोकरदार मंडळीच्या माध्यमातून सरकारच्या या शासन निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.