State Employee News : तुम्ही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत आहात का, महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचारी म्हणून काम पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे तुमच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की लोकसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक मास्टरस्ट्रोक लगावला.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता दिला जातो. यामध्ये मात्र जानेवारी 2024 पासून 4% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणजे महागाई भत्ता ज्याला डीए असं म्हणतात तो आता 50 टक्के एवढा झाला आहे. याचा रोख लाभ मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनासोबत अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्यात त्यांच्या हातात येईल त्या वेतना सोबत दिला जाणार आहे.
हा वाढलेला भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आला असल्याने सदर सरकारी नोकरदार मंडळीला जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील डीए वाढीचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश येथील राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.
महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार DA वाढीचा लाभ
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50% होणे अपेक्षित आहे.
खरंतर राज्य कर्मचाऱ्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या बाबतचा निर्णय वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार घेणार अशी आशा होती. परंतु राज्य सरकारने हा निर्णय घेणे टाळले आहे.
तथापि, केंद्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आचार संहिता लागू होण्यापूर्वीच जाहीर केला आहे.
याशिवाय राज्यातील मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील यावेळी राज्य कर्मचाऱ्यांच्या आधीच वाढवण्यात आला आहे. बीएमसी मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. जानेवारी 2024 पासून त्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे.
यामुळे आता निवडणुका संपन्न झाल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतरच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या 17 लाख कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल असे बोलले जात आहे.