State Employee News : राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला आहे. राज्यातील पाचवा वेतन आयोग, सहावा वेतन आयोग आणि सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे.
यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ राज्य शासनाने अनुज्ञय केला आहे. राज्य शासनाने जानेवारी महिन्यापासून ही महागाई भत्ता वाढ लागू केली असून महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांना वर्ग केली जाणार आहे.
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना यांची पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पालिका आयुक्तांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा झाली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या पंधरा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या दिवशीच त्यांचा सत्कार करून त्यांना पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, रजेचा पगार असे निवृत्तीचे सर्व लाभ दिले जात असत.
मात्र आता पालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळण्यासाठी चार ते पाच वर्षे झगडत राहावे लागते. यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळावेत यासाठी महानगरपालिकेच्या कामगार कर्मचारी संघटनेने महापालिका आयुक्तांचे या बैठकीत लक्ष वेधले.
यावर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी सेवानिवृत्तीचे सर्व लाभ दिले जातील अशी ग्वाही दिली आहे. यासोबतच, पाच लाख रुपयांच्या वैद्यकीय विमा पॉलिसीसाठी प्रीमियमची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यास देण्याचे या बैठकीत तत्त्वतः मान्य करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली असून आता पॉलिसी सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.
यासोबतच पालिका कर्मचाऱ्यांच्या सर्व भत्त्यात वाढ केली जाणार आणि जुनी पेन्शन योजना राज्य शासनाने लागू केल्यास आठ मे 2008 नंतर पालिकेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ लागू होईल असेही आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. तसेच चतुर्थश्रेणी कामगारांमध्ये 10वी पास/नापास असा भेदभाव करू नये.
दोघांनाही समान म्हणजे 1800 रुपये ग्रेड पे द्यावा, या मागणीवर लवकरच निर्णय घेतला जाईल असं देखील आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त बायोमेट्रिक हजेरी ही वेतनाशी जोडू नये, रिक्त पदे भरताना कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, इत्यादी मागण्या या बैठकीत प्रशासनाकडे करण्यात आल्या असल्याची माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर आली आहे.
वेतनवाढीबाबत झाला हा निर्णय
वास्तविक, सध्या मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार एक जुलैपासून वेतन वाढ दिली जात आहे. यामुळे 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही वेतन वाढ मिळत नाही. अशा परिस्थितीत यादेखील कर्मचाऱ्यांना ही वेतन वाढ मिळावी यासाठी एक अतिरिक्त वेतन वाढ थकबाकीसह दिली जाईल असे या बैठकीत मान्य करण्यात आले आहे.
यासाठी लवकरच पालिकेच्या माध्यमातून परिपत्रक काढले जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. निश्चितच मुंबई महानगरपालिकामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेले हे सर्व निर्णय त्यांच्यासाठी दिलासादायी ठरणार आहेत. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पालिका आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.