State Employee Retirement Age : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये संपूर्ण देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच निवडणूकांची रणधुमाळी रंगणार म्हणून रणांगण तयार करण्यासाठी शासनाकडून सुरुवात झाली आहे.
शासनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कष्टकरी शेतमजुरांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील महत्त्वाचे निर्णय होत आहेत. अशातच आता राज्य शासन लवकरच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर लवकरच राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ होणार आहे. यामुळे निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांना अच्छे दिन येणार असून त्यांना अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे. खरंतर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे.
याव्यतिरिक्त देशातील बहुसंख्य राज्यात सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षेच आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही संवर्गातील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे करण्यात आले आहे. मात्र बहुसंख्य कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षे एवढेच आहे.
अशातच सेवानिवृत्तीच्या वयाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढणार आहे. अर्थातच त्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्षे होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे विचाराधीन आहे. पण प्रस्ताव विचाराधीन असताना देखील यावर राज्य शासनाकडून लवकर निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सध्या नाराजीचे सुरु उमटू लागले आहेत.
दरम्यान याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा म्हणून विविध संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू असून यासाठी वेळोवेळी निवेदने दिली जात आहेत. अशातच आता निवडणुकीचा हंगाम सुरू होणार असल्याने शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेईल आणि लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.