Success Story : अलीकडे शेती हा व्यवसाय मोठा आव्हानात्मक बनला आहे. शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीमधून शेतकऱ्यांना अनेकदा पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाही.
मात्र जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर चांगली कमाई होऊ शकते. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी हे आपल्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या एका आदिवासी शेतकऱ्याने देखील हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
तालुक्यातील कोपरगाव जवळील काठेवाडी येथील आदिवासी शेतकरी रमेश बांगर यांना पूर्वी शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते.
परिणामी संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांना रोजंदारीने कामाला जावे लागत असे. ते तीनशे रुपये रोजाने रोजंदारीचे कामे करत. दुसऱ्यांच्या शेतात भात कापणीची कामे ते करत. मात्र, रोजंदारीच्या कामांमधून फक्त घराचा खर्च भागत असे.
अशातच मात्र त्यांना त्यांच्या काकांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा सल्ला दिला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी रमेशला पैसे देखील दिलेत. काकांकडून पैसे घेतल्यानंतर रमेश यांनी 4800 स्ट्रॉबेरीची रोपे पाचगणी येथून खरेदी केलीत.
रोपे खरेदी केल्यानंतर त्यांनी आपल्या 14 गुंठ्यात Strawberry लागवड केली. दरम्यान त्यांचा हा प्रयोग आता यशस्वी झाला आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखवली आहे.
विशेष म्हणजे त्यांना स्ट्रॉबेरीच्या पिकातून जवळपास दोन लाखांपर्यंतची कमाई होण्याची आशा आहे. रमेश सांगतात की ते ज्या शेतात पूर्वी धान अर्थातच भात पिकाची शेती करत असत.
मात्र त्यांना यातून फक्त चार हजार रुपये मिळत. त्यांना शेतीमधून दहा हजाराची पण कमाई होत नसे. मात्र स्ट्रॉबेरी लागवड केली आणि हा निर्णय त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरला आहे.
त्यांनी 14 गुंठे जमिनीत स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे. यातून त्यांना आतापर्यंत तीस हजार रुपयांची कमाई झाली असून अजूनही शेतात निम्म्याहुन अधिक माल शिल्लक आहे.
यामुळे त्यांना स्ट्रॉबेरीच्या पिकातून जवळपास दोन लाखांपर्यंतची कमाई होईल असा अंदाज आहे. निश्चितच ज्या शेतातून आधी दहा हजाराची पण कमाई होत नव्हती त्यातून लाखो रुपयांची कमाई करून रमेश यांनी इतरांसाठी प्रेरणादायी काम केले आहे.