Successful Farmer : गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला होता. खरीप हंगामातील जवळपास सर्वच मुख्य पिकांची राख-रांगोळी झाली होती. मात्र शेतकऱ्यांनी न खचता रब्बी हंगामासाठी उसनवारीने पैसे घेऊन शेत फुलवले. गेल्या रब्बी हंगामातील हवामान देखील पिकांसाठी पोषक होते. पण नियतीला काही औरच मान्य होते.
शेतकऱ्यांनी बहु कष्टाने फुलवलेले शेत पुन्हा एकदा अवकाळी पावसाने बरबाद झाले. शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम वाया गेला आणि रब्बीही वाया गेला. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे विस्कटले. दरम्यान यावर्षी मानसूनने शेतकऱ्यांसोबत दगाफटका केला आहे.
यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले आहे शिवाय अजूनही मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. यामुळे शेतकरी बांधव निसर्गाच्या या दुष्टचक्रामुळे पुरता हतबल झाला आहे. परंतु या विपरीत परिस्थितीमध्ये देखील काही शेतकऱ्यांनी शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पावसामुळे जिथे अनेक शेतकऱ्यांना पिकांसाठी केलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही तिथे वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एकरी सहा लाखांचे उत्पन्न कमवून दाखवल आहे. यामुळे सध्या या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील घोटी येथील युवा शेतकरी विठ्ठल तांदळे यांनी पारंपारिक पिकांना बगल दाखवत फुल पीक शेतीमध्ये आपले नशिब आजमावले. त्यांनी यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले. तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ घेतला आणि आपल्या एक एकर जमिनीत गुलाबाची शेती सुरू केली.
दोन वर्षांपूर्वी त्यांनी कृषी विभागाच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने गुलाबाची रोपे मागवली आणि गुलाब शेतीला सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या गुलाबाच्या रोपांना आता चांगली फुले लागली आहेत.
विशेष म्हणजे त्यांनी उत्पादित केलेल्या गुलाबांच्या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे. वाशिम जिल्ह्यात तसेच हिंगोली जिल्ह्यातही त्यांची गुलाबाची फुले विकली जात आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांना आतापर्यंत पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
एकीकडे अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला तर दुसरीकडे तांदळे यांसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बगल दाखवत बागायती पिकांमधून, फुल पिकांमधून, फळ पिकांमधून चांगले लाखोंचे उत्पन्न कमावले आहे. निश्चितच तांदळे यांनी शेतीमध्ये केलेले हे काम इतर युवा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.