Successful Women Farmer : भारताची जवळपास 60 टक्के जनसंख्या ही शेती व शेती पूरक उद्योगांवर अवलंबून आहे. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शेती हा व्यवसाय कणा आहे. पण देशातील शेती व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी अधिक आहे.
महिला शेतात काम करतात मात्र शेती व्यवसायात त्यांची सक्रियता खूपच कमी पाहायला मिळते. परंतु आता हे चित्र हळूहळू बदलू पाहत आहे. कृषीप्रधान भारत देशात आता महिला देखील पुरुषांप्रमाणेच शेतीमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणेच आता शेती क्षेत्रात देखील महिलांची सक्रियता वाढू लागली आहे.
विशेष म्हणजे महिला केवळ नावाला शेती करतात असे नाही तर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई देखील करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील खैरगाव येथील एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
खैरगाव येथील शोभा गायधने यांनी हळद पिकाच्या आणि इतर आंतरपिकाच्या लागवडीतून तब्बल 16 लाखांचे उत्पन्न कमवून दाखवले आहे. यामुळे सध्या गायधने यांची सर्वत्र चर्चा आहे. मनात काही तरी वेगळे करण्याची इच्छा असेल आणि यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत घेतली तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते याचेच एक उत्तम उदाहरण आहेत शोभा गायधने.
शोभा गायधने शेतीच्या जोरावर वर्षाकाठी 16 लाखांची उलाढाल करत आहेत. यामुळे त्यांच्या या कार्याची महाराष्ट्र राज्य शासनाने देखील दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने गायधने यांना सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. गायधने यांच्याकडे 15 एकर जमीन आहे. ते यात सेंद्रिय शेती करतात. हळद तसेच इतर भाजीपाला पिकांची लागवड करतात.
गायधने गेल्या 22 वर्षांपासून 15 एकरात शेती करत आहेत. त्यांनी पिकाच्या वाढीसाठी जीवामूर्त, दशपर्णी आणि निंबोळी अर्काचा वापर केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ते त्यांच्या 15 एकर जमिनीत वायगाव या हळदीची आणि ज्वारी गहू हरभरा शेवगा यांसारख्या इत्यादी पिकांची शेती करतात.
दरवर्षी ते एक एकर हळद पिकातून 12 ते 15 क्विंटल चे उत्पादन घेत आहेत. गायधने हळद बेणे, कच्ची हळद, हळद पावडर यांची विक्री करून वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. हळद आणि इतर अन्य पिकाच्या लागवडीतून त्यांना वर्षाकाठी 15 ते 16 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. निश्चितच या महिला शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीच्या जोरावर लाखो रुपयांची कमाई करून इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे.