Sukanya Samriddhi Yojana : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात स्त्रीभ्रूण हत्या हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे. खरे तर, काळाच्या ओघात भारतीय संस्कृतीत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मात्र, आजही आपल्या भारतात स्त्रीला दुय्यम स्थान मिळत आहे ही वास्तविकता आहे.
परिस्थिती हळूहळू बदलत आहे मात्र तरीही स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये अजूनही समानता आलेली नाही. आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
विशेष म्हणजे येत्या काही वर्षात ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची बनणार आहे. म्हणजेच भारताची वेगाने विकसित होण्याकडे वाटचाल सुरू आहे. वास्तविक, भारताच्या विकासात महिलांचा मोठा वाटा आहे.
यामुळे आता शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात आहेत. महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा देखील समावेश होतो.
खरे तर ही सरकारी योजना केंद्र शासनाची एक महत्वकांक्षी योजना असून या बचत योजनेत दहा वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावाने गुंतवणूक करता येते. ही योजना मुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी पैशांची अडचण भासू नये यासाठी सुरू करण्यात आली आहे.
मुलीच्या आई-वडिलांना तसेच पालकांना या योजनेच्या माध्यमातून चांगला परतावा मिळत आहे. दरम्यान आज आपण या योजने अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर सरकारकडून किती व्याज दिले जात आहे.
तसेच या योजनेत जर दरवर्षी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती व्याज मिळते ?
मिळालेल्या माहितीनुसार, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेसाठी सरकारच्या माध्यमातून 8.2 टक्के एवढे व्याज दिले जात आहे. या योजनेत दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येऊ शकते. यापेक्षा जास्तीची गुंतवणूक या योजनेत करता येत नाही.
तसेच या वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावाने गुंतवणूक सुरू केल्यानंतर पुढील पंधरा वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करावी लागते. पण योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षांचा आहे. अर्थातच पंधरा वर्षानंतरही ही गुंतवणुकीची रक्कम खात्यातच राहते. पण, पंधरा वर्षानंतर या योजनेत पैसे गुंतवावे लागत नाहीत, दुसरीकडे जमा पैशांवर व्याज मिळतचं राहते.
दरवर्षी एक लाख गुंतवले तर किती मिळणार ?
जर या योजनेत दरवर्षी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर 47 लाख 88 हजार 79 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये 15 लाख रुपये हे गुंतवणुकीचे राहणार आहेत तर उर्वरित पैसे व्याजाचे राहतील. म्हणजेच 21 वर्षानंतर सदर मुलीला 32 लाख 88 हजार 79 रुपये व्याजाचे मिळणार आहेत.