Pune Ring Road : महाराष्ट्र राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने विविध रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहेत. खरं तर कोणत्याही प्रदेशाचा किंवा राज्याच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते.
दळणवळण व्यवस्था चांगली राहिली तर त्या राज्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होतो. यामुळे आपल्या राज्यातही सध्या दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यात वेगवेगळे महामार्ग तयार केले जात आहे.
यामध्ये पुणे रिंग रोड, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गीका आणि जालना-नांदेड समृद्धी महामार्ग या 3 मार्गांचा देखील समावेश होतो. हे तीनही मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित केले जाणार आहेत. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने सध्या भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.
या तीनही प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनाला गती देण्यात आली आहे. पुणे रिंग रोड हा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हाती घेण्यात आला आहे. पुणे रिंग रोड हा 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा प्रकल्प फक्त पुणे शहरासाठीच नाही तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी देखील अति महत्त्वाचा असा प्रकल्प आहे.
या प्रकल्पामुळे पुणे शहराच्या आणि पुणे जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असल्याचा दावा केला जातो आहे. खरंतर पुणे रिंग रोड या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात केले जात आहे. पश्चिम रिंग रोड आणि पूर्व रिंग रोड असे दोन भाग पाडून याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.
सध्या स्थितीला पश्चिम रिंग रोड साठीच्या भूसंपादनाचे काम सूरु आहे. यासोबतच समृद्धी महामार्गाचा विस्तार करून जालना-नांदेड समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. तसेच विरार ते अलिबाग दरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी विरार अलिबाग कॉरिडोर विकसित केला जात आहे.
सध्या या तीनही प्रकल्पासाठीचे भूसंपादन जलद गतीने सुरु आहे. विशेष म्हणजे या तिन्ही प्रकल्पाचे भूसंपादन या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या तीनही प्रकल्पांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला एकूण 28 कंपन्यांनी प्रतिसाद दाखवला आहे. आता ऑक्टोबर अखेरीस प्रत्यक्ष बांधकामासाठी आर्थिक निविदा मागवल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच डीसेंबर अखेरपर्यंत निविदा अंतिम केल्या जाणार आहेत आणि जानेवारी 2024 मध्ये या तीनही प्रकल्पांचे काम सुरू केले जाणार आहे. याचाच अर्थ येत्या नवीन वर्षात या तीनही प्रकल्पांचे बांधकाम सुरू होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने तसा संकल्पच केला आहे. यामुळे आता राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेला हा संकल्प खरा ठरतो का आणि नवीन वर्षात या तीनही प्रकल्पांचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.