Maharashtra News : मुंबई आणि मुंबई लगत वसलेल्या उपनगरांचा गेल्या काही दशकांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. शहराचा आणि उपनगराचा वाढता विस्तार पाहता शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात ट्रॅफिकची समस्या कॉमन बनत चालली आहे.
या ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर आता वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहे. वाहतूक कोंडीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरात कोस्टल रोड, भूयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी सेतू यांसारखी विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत.
मेट्रोचे देखील नेटवर्क विस्तारले जात आहे. वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रो सुरु केल्या जात आहेत. लोकलची सेवा विस्तारली जात आहे. एकंदरीत शहरात आणि उपनगरात रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक मजबूत बनवली जात आहे. सर्वसामान्यांनी खाजगी वाहनांचा वापर सोडून अधिका-अधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राजधानी मुंबईमध्ये देशातील सर्वात लांब सागरी सेतू तयार केला जात आहे. सर्वसामान्यांचा प्रवास जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी वसई ते विरार दरम्यान सागरी सेतू विकसित केला जात आहे. या सागरी सेतू प्रकल्पामुळे वसई ते विरार हा प्रवास जलद आणि गतिमान होणार आहे. दरम्यान या सागरी सेतू प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
तो म्हणजे हा प्रकल्प आता पालघर पर्यंत वाढवला जाणार आहे. म्हणजेच वसई ते विरार सी लिंक आता पालघर पर्यंत विस्तारला जाणार आहे. खरतर, हा प्रकल्प आधी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार होता. मात्र आता या प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीए कडून पूर्ण केले जाणार आहे. आता आपण वसई ते पालघर दरम्यान तयार होणारा सी लिंक प्रकल्प बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असेल रूटमॅप
वसई-विरार सागरी सेतू प्रकल्पाचा विस्तार पालघर पर्यंत होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात वसई ते वांद्रे असा सागरी सेतू विकसित केला जाणार होता. यानंतर मग टप्प्याटप्प्याने वांद्रे ते विरार पर्यंत हा सागरी सेतू तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता विरार ते पालघर पर्यंत सागरी सेतू तयार केला जाणार आहे.
यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जात आहे. डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागाराची देखील नियुक्ती केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत वसई ते विरार दरम्यान 42.75 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू विकसित होणार आहे.
या सागरी सेतूला चारकोप, मीरा-भाईंदर, वसई, विरार या चार ठिकाणी जोडणी दिली जाणार आहे. या रूटवर विशेष रॅम्प व मार्किका उभी केली जाणार आहे. यामुळे याची लांबी 52 किलोमीटर एवढी होईल असे सांगितले जात आहे. म्हणून हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू ठरणार आहे.
यासाठी जवळपास 63,426 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा सागरी सेतू प्रकल्प मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला जाणार आहे. खरंतर वर्सोवा ते वसई, वसई ते विरार आणि आता विरार ते पालघर दरम्यान सी लिंक तयार केला जाणार आहे. तसेच हे तिन्ही सी लिंक परस्परांना जोडले जाणार आहेत. यामुळे आता वर्सोवा ते थेट पालघर पर्यंत सागरी सेतू मार्गाने प्रवास करता येणार आहे.