Mumbai To Pune Travel : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे.
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पुणे ते मुंबई दरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात. सध्या स्थितीला रस्ते मार्गाने पुणे ते मुंबई हा प्रवास करायचा झाल्यास चार तासांचा वेळ खर्च करावा लागतोय.
वाहतूक कोंडीमुळे तर कित्येकदा प्रवासाचा हा कालावधी आणखी वाढत असतो. परंतु भविष्यात मुंबई ते पुण्याचा प्रवास गतिमान होणार आहे. भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त पंचवीस मिनिटात पूर्ण केला जाऊ शकतो असा दावा केला जाऊ लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य शासनाने हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टम प्रोजेक्ट ला मान्यता दिलेली आहे. विशेष म्हणजे जगात पहिल्यांदाच हायपरलूप टेक्नॉलॉजीला पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान याच हायपरलूप ट्रेनने भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास 25 मिनिटात करता येणे शक्य होणार आहे.
सध्या स्थितीला मुंबई ते पुणे हा प्रवास विमानाने केला तरी देखील 48 मिनिटांचा वेळ लागत आहे. परंतु हायपरलूप ट्रेनने हा प्रवास फक्त 25 मिनिटात होणार असल्याने विमानापेक्षाही हा प्रवास गतिमान राहणार आहे. विशेष म्हणजे याचे भाडे देखील परवडणारे राहणार असा दावा केला जात आहे.
चुंबकीय तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या पॉडवर (ट्रॅक) बुलेट ट्रेनच्या दुप्पट वेगाने ही ट्रेन धावणार अशी माहिती दिली जात आहे. ही ट्रेन व्हॅक्यूम ट्यूब सिस्टीममधून जाणाऱ्या कॅप्सूल सारख्या हायपरलूपमध्ये सुमारे 1200 किमी प्रति तास वेगाने धावणार आहे. विशेष बाब अशी की या प्रकल्पाची चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे.
ही चाचणी पुण्यात सुरू झाली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. चाचणी करण्यासाठी 100 मीटर लांबीची व्हॅक्यूम ट्यूब बनवण्यात आली आहे. यामध्ये ही चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या पुढील कारवाईसाठी राज्य शासन पुढाकार घेणार आहे.
तथापि, 2032-33 पर्यंत पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप गाड्या सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हायपरलूप ट्रेन मुंबईतील बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथून सुरू होईल आणि पुण्यातील वाकडपर्यंत जाणार आहे.
हे अंतर जवळपास 117 किलोमीटरचे आहे. हे ११७ किलोमीटरचे अंतर ही हायपरलूप ट्रेन फक्त आणि फक्त 25 मिनिटात पार करणार आहे. हायपरलूप ट्रेनसाठी बोगद्यासारखा मार्ग तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून हवेच्या दाबाअभावी ट्रेन जास्त वेगाने धावू शकेल.
अमेरिकन कंपनी व्हर्जिन ग्रुपने मुंबई-पुणे हायपरलूपने जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे. विशेष बाब अशी की हायपरलूप ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षा कमी राहणार आहे.
एक हजार रुपये ते पंधराशे रुपये प्रति व्यक्ती एवढे या ट्रेनचे भाडे राहणार असल्याचा दावा केला जात आहे. एकंदरीत हा प्रकल्प जर भविष्यात पूर्ण झाला तर मुंबई ते पुणे हा प्रवास खूपच गतिमान होणार असून यामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.