Turmeric Rate : हळद हे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची लागवड मध्य महाराष्ट्रातील काही भागात देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. सांगली व आजूबाजूचा परिसर हळद उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या बाजारभावात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात हळदीला विक्रमी दर मिळत होता मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दरात सातत्याने घसरणच पाहायला मिळाली आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी संभ्रमाअवस्थेत आहेत.
ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यातील वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला तब्बल वीस हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळू लागला होता. यामुळे त्यावेळी हळद उत्पादकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत होते. हळदीचे पीक यंदा तरी चांगला नफा देऊन जाईल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागून होती.
मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दरात खूप मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. वसमत एपीएमसीमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत या चालू महिन्यात हळदीच्या दरात तब्बल आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतची घसरण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यामुळे अवघ्या काही दिवसातच दरात एवढी विक्रमी घट झाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वसमत एपीएमसीप्रमाणेच हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये देखील हळदीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.
या मार्केटमध्ये गेल्या 25 दिवसांमध्ये हळदीच्या बाजारभावात प्रतिक्विंटलमागे दोन हजार रुपये ते 2500 रुपये प्रति क्विंटल एवढी घट आली आहे. काल झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये हळदीला किमान 11500 रुपये प्रति क्विंटल, कमाल 13000 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 12200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
गेल्या 25 दिवसांपूर्वी मात्र या मार्केटमध्ये हळदीला तब्बल 15000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत होता. वसमत एपीएमसी मध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यात हळदीला 20,000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता. मात्र 12 सप्टेंबर रोजी झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये हळदीला 8500 रुपये प्रति क्विंटल ते 14,455 प्रतिक्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे.
एकंदरीत अवघ्या 20 ते 22 दिवसांच्या काळात हळदीच्या बाजारभावात हजारो रुपयांची घसरण झाली असल्याने हळद उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत सापडले आहेत. दरम्यान, काही तज्ञांनी गणेशोत्सव झाल्यानंतर हळदीच्या दरात तेजी येऊ शकते असे सांगितले आहे.
विशेष म्हणजे हळदीला गणेशोत्सवानंतर ऑगस्ट महिन्यापेक्षाही जास्तीचे दर मिळतील असा आशावाद देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता तज्ञ लोकांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.