Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली. तेव्हापासून ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनलेली आहे. या गाडीची मोठी क्रेज पाहायला मिळते. या वंदे भारत ट्रेनची नेहमीच प्रवाशांमध्ये चर्चा असते.
यामुळे देशातील विविध मार्गांवर या गाडीचे संचालन सुरु व्हावे यासाठी रेल्वे कडे पाठपुरावा केला जातो. या पाठपुराव्यानुसार आत्तापर्यंत देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील आठ मार्ग हे आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महाराष्ट्रात ज्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहे त्या साऱ्या मार्गावरील प्रवाशांनी या गाडीला अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. आधी तिकीट दर अधिक असल्याने वंदे भारत ट्रेनला नागरिक एवढा प्रतिसाद दाखवणार नाहीत असे म्हटले जात होते.
मात्र झाले सारे उलट तिकीट दर अधिक असतानाही या गाडीमध्ये असणाऱ्या वर्ल्ड क्लास सोयीसुविधा, या गाडीचा अधिकचा वेग तसेच सुरक्षित प्रवास अशा कारणांमुळे प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवलेली आहे.
अशातच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या वंदे भारत एक्सप्रेस चा स्पीड आता वाढणार आहे.
पश्चिम रेल्वे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवणार असून यासाठीची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे. सध्या ही गाडी 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे.
मात्र, आता लवकरच 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने या गाडीला चालवले जाईल. यासाठी ट्रायलच्या तारखा लवकरच डिक्लेअर होणार आहेत.
जेव्हा ही ट्रायल यशस्वी होईल तेव्हा या मार्गावरील वंदे भारत ट्रेन 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल असे म्हटले जात आहे.
असे झाल्यास प्रवाशांच्या वेळेत तब्बल 45 मिनिटांची बचत होणार आहे. म्हणजेच भविष्यात मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास आणखी जलद होणार आहे.