Vande Bharat Express : भारतीय रेल्वेने 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. ही ट्रेन संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे. प्रवाशांनी या गाडीला चांगला प्रतिसाद दाखवला आहे.
सध्या स्थितीला देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातही पाच वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहे. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपुर या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे येत्या काही दिवसात राज्याला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या मार्गावर देखील ही गाडी सुरू होणार आहे. येत्या काही महिन्यात या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे.
वंदे भारत एक्सप्रेसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु अनेक लोक ही गाडी फक्त श्रीमंतांसाठी सुरू झाली असल्याचा आरोप करतात. याचे कारण म्हणजे या गाडीचे तिकीट दर खूपच अधिक आहे. त्यामुळे आता भारतीय रेल्वेने सर्वसामान्य लोकांना देखील वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवासाचा अनुभव मिळावा आणि या वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच सर्वसामान्यांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या धरतीवर नवीन ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय रेल्वे आता वंदे साधारण ट्रेन सुरू करणार आहे. ही वंदे साधारण ट्रेन नॉन एसी राहणार आहे. पण या गाडीचा वेग हा 130 किलोमीटर प्रतितास एवढा असेल. या गाडीचे तिकीट दर वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा खूपच कमी राहतील. ही ट्रेन 22 डब्यांची असेल आणि यासाठी 65 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.
या गाडीचे डबे चेन्नई येथील कोच फॅक्टरी मध्ये तयार होत असून या गाडीसाठीचे इंजिन चितरंजन लोकोमोटिव वर्क्स येथे तयार केले जात आहे. विशेष म्हणजे या गाडीची चाचणी ऑक्टोबर अखेरपर्यंत होणार आहे. यामुळे लवकरच ही गाडी रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होऊ शकतो असा आशावाद व्यक्त होत आहे.
पण ही गाडी प्रत्यक्षात केव्हा धावणार याबाबत अद्याप रेल्वे विभागाकडून कोणतीच ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान रेल्वे प्रवाशांना यादेखील गाडीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच काही हायटेक सुविधा दिल्या जाणार आहेत. जसे की या ट्रेनमध्ये बायो वॅक्यूम स्वच्छता गृह, प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक सीटवर चार्जिंग पॉईंट दिले जाणार आहे.