Vande Bharat Express News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच खास ठरणार आहे. कारण की, महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. सध्या स्थितीला राज्यात सात वंदे भारत ट्रेन सुरू आहेत.
मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे या सर्व गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. यामुळे गदगद झालेल्या रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इतरही अन्य काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
अशातच आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे, कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबतचे नियोजन सद्यस्थितीला सुरू आहे.
म्हणजेच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार हे जवळपास नक्की झाले आहे. खरे तर या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू व्हावी यासाठी मिरज रेल्वे कृती समितीने पाठपुरावा केला आहे.
मिरज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती.
याच मागणीबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबतचे सध्या नियोजन सुरू असल्याचे सांगितले आहे.
जर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान ही गाडी सुरू झाली तर येथील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.