Vande Bharat Express : देशात सध्या सर्वत्र एकाच गोष्टीची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ती म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसची. 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस प्रथम रुळावर धावली. त्यानंतर या ट्रेनने मागे वळून पाहिलेच नाही. सध्या देशातील एकूण 17 महत्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेच्या माध्यमातून चालवली जात आहे.
विशेष बाब अशी की, येत्या काही दिवसात आणखी पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. 26 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भोपाळ येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या पाच गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या पाच गाड्यांमध्ये महाराष्ट्राला देखील एका वंदे भारत ट्रेनचा लाभ मिळणार आहे.
मुंबई-गोवा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या बंद भारत एक्सप्रेसला देखील याच दिवशी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. शिवाय, ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात 75 चेअर कोचं वंदे भारत चालवल्या जातील असा दावा केला जात आहे. अशातच आता या ट्रेन संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे आता लवकरच वंदे भारत एक्सप्रेस मधून झोपून प्रवास करता येणार आहे.
हो! बरोबर ऐकताय तुम्ही या सेमी हायस्पीड ट्रेन प्रकारात रेल्वेच्या माध्यमातून स्लीपर कोच गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास झोपून पूर्ण करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने 80 स्लीपर कोच वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी एका सरकारी कंपनीला कंत्राट दिले आहे. 24 हजार कोटी रुपयांचे हे कंत्राट असून पुढील दोन वर्षात पहिली स्लीपर कोच वंदे भारत ट्रेन तयार होणार आहे.
बीएचईएल आणि टीआरएसएल यांना संयुक्तरिक्त्या 80 स्लीपर कोच वंदे भारत ट्रेन बनवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. खरंतर सध्या चेअर कोच वंदे भारत धावत आहेत, यामुळे रात्रीच्या लांबच्या प्रवासासाठी या गाड्यां रेल्वे प्रवाशांच्या उपयोगाच्या नाहीत. म्हणून रात्रीचा लांबचा प्रवास करण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत.