Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरेतर ही एक्सप्रेस ट्रेन 2019 मध्ये भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आली असून सध्या देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरु आहे. यापैकी सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. या हायस्पीड ट्रेनमुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा खूपच गतिमान झाला आहे.
ही ट्रेन तब्बल 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. यामुळे प्रवाशांना जलद प्रवास करता येत आहे. शिवाय या गाडीमध्ये प्रवाशांना अनेक हायटेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
परिणामी रेल्वे प्रवासी या गाडीने प्रवास करण्यास पसंती दाखवत आहेत. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असून प्रवाशांच्या माध्यमातून देशातील विविध मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
अशातच, भारतीय रेल्वे लवकरच देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करू शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रचंड मागणी लक्षात घेऊन रेल्वे दक्षिणेतील लोकप्रिय मार्गावर वंदे भारत चालवू शकते.
असे म्हटले जात आहे की, लवकरच वंदे भारत बेंगळुरू आणि एर्नाकुलम दरम्यान कार्यरत होण्याची शक्यता आहे. हे खरे ठरले तर वंदे भारत दक्षिण भारतातील सर्वाधिक गर्दीच्या दोन रेल्वे स्थानकांदरम्यानच्या ट्रॅकवर धावणार आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन एर्नाकुलम येथून पहाटे 5 वाजता सुटेल आणि दुपारी 1:35 वाजता बेंगळुरूला पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही ट्रेन बेंगळुरूहून दुपारी 2:05 वाजता सुटेल आणि 10:45 वाजता एर्नाकुलमला पोहोचणार आहे.
दरम्यान ही ट्रेन आपल्या प्रवासात त्रिशूर, पलक्कड, कोईम्बतूर, इरोड आणि सेलम या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची बातमी समोर आली आहे.