Vande Bharat Express : महाराष्ट्रासाठी 2024 हे वर्ष खूपच महत्त्वाचे आणि खास राहणार आहे. या चालू वर्षात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच राज्यात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून या चालू वर्षात महाराष्ट्राला तब्बल सात नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार असे वृत्त समोर आले आहे.
असे झाले तर निश्चितच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. सध्या देशात एकूण 41 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून यापैकी सात गाड्या आपल्या राज्यातून धावत आहेत. या सात पैकी पाच गाड्या राजधानी मुंबईहून धावत आहेत.
मुंबई येथून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन चालवली जात आहे.
याशिवाय उपराजधानी नागपूर एक नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी धावत आहे.
आता मात्र लवकरच या हाय स्पीड ट्रेनची महाराष्ट्रातील संख्या वाढणार आहे. रिपोर्टनुसार महाराष्ट्रात येत्या वर्षभराच्या काळात नवीन 7 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत.
कोणत्या मार्गांवर धावणार हायस्पीड ट्रेन
मीडिया रिपोर्टनुसार, येत्या वर्षभरात मुंबईला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते शेगाव आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.
शिवाय सांस्कृतिक राजधानी पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असे सांगितले जात आहे. पुण्याहून पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा आणि पुणे ते सिंकदराबाद या चार मार्गांवर ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे.
यापैकी पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर धावणारी गाडी सोलापूर मार्गे चालवली जाण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सुरू असून एक्सप्रेसला पूर्णविराम देऊन त्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची दाट शक्यता आहे.
असे झाल्यास राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या ही 14 वर पोहोचणार आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे.