Vande Bharat Train : येत्या पाच दिवसात भारतीय रेल्वे देशात नवीन पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे. 27 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. गोवा-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या पाच मार्गावर ही ट्रेन सुरु होणार आहे.
खरतर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव म्हणजेच मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन तीन जूनला सुरू होणार होती. मात्र ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे हा लोकार्पणाचा सोहळा रद्द करण्यात आला. आता 27 जूनला या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या देशात 18 वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. आता येत्या पाच दिवसात नवीन पाच गाड्यां सुरु होणार आहेत. म्हणजेच येत्या काही दिवसानंतर देशातील एकूण वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 23 वर पोहोचणार आहे.
महाराष्ट्रात सध्या चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून मुंबई गोवा मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाल्यानंतर राज्यातील वंदे भारत ट्रेनची संख्या पाचवर पोहचणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत, त्यांचे मार्ग आणि वेळापत्रक या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत?
सध्या राज्यात नागपूर-बिलासपूर, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी या चार मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे.
राज्यात सुरु असलेल्या वंदे भारत ट्रेन चे वेळापत्रक
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर :- ही ट्रेन मुंबई सेंट्रेलवरुन सकाळी 6:00 वाजता रवाना होते आणि गांधीनगरला 12:25 वाजता पोहचते. तसेच गांधीनगरवरुन दुपारी 2:05 वाजता रवाना होते आणि मुंबई सेंट्रलला रात्री 8:25 ला पोहचते.
मुंबई ते सोलापूर :- ही ट्रेन मुंबईवरुन दुपारी 4.05 वाजता रवाना होते आणि सोलापूरला रात्री 10.40 ला पोहचते. तसेच सोलापूरवरुन सकाळी 6:05 वाजता रवाना होते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी 12:35 वाजता पोहचते.
मुंबई ते साईनगर शिर्डी :- ही ट्रेन मुंबईवरुन सकाळी 6:20 वाजता सुटते आणि शिर्डीला 11:40 वाजता पोहचते. तसेच शिर्डीवरुन ही ट्रेन संध्याकाळी 5:25 वाजता सुटते आणि मुंबईला रात्री 10:50 वाजता पोहचते.
नागपूर-बिलासपूर :- ही गाडी शनिवार वगळता सहा दिवस धावते. ही ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी 02:05 वाजता सुटते आणि 07:35 वाजता बिलासपूरला पोहोचते. बिलासपूर येथून सहा वाजून 45 मिनिटांनी निघते आणि नागपूरला बारा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते.