Vande Bharat Train : आज देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यानंतर आणखी दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि 4 जून 2024 ला मतदानाचा निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राला एक नवीन vande भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून समोर येत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली देशातील पहिली हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली होती. सध्या देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.
यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अर्थातच राजधानी मुंबईला आत्तापर्यंत 6 वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली आहे. विशेष म्हणजे राजधानी मुंबईला आता लवकरच 7 व्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
मुंबईतील 7 वी आणि महाराष्ट्रातील 9 वी वंदे भारत एक्सप्रेस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अर्थातच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची मोठी माहिती दिली.
यावेळी त्यांनी, कोल्हापूरला प्रतीक्षा असलेली वंदे भारत रेल्वे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कोल्हापूर-मुंबई ट्रॅकवरून सुरू होणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून काही साप्ताहिक रेल्वे गाड्या धावतात. या गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.
तसेच कोल्हापूर हे कोकण रेल्वेला जोडण्याची मागणीही प्रलंबित आहे. याबाबत सकारात्मक विचार केला जाणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. एवढेच नाही तर कोरोना काळापासून बंद असलेली सह्याद्री एक्सप्रेस सुरू करण्यासंदर्भात देखील सकारात्मक असा निर्णय होईल असे त्यांनी यावेळी म्हटले.