Railway News : गेल्या काही वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगातील रामभक्त ज्या राम मंदिराची आतुरतेने वाट पाहत होते ते अयोध्या स्थित प्रभू श्रीरामांचे मंदिर आता राम भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. या मंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर नवीन वर्षात हे मंदिर राम भक्तांसाठी खुले होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील अयोध्या मध्ये तयार होत असलेल्या भव्यदिव्य राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा नवीन वर्षात 22 जानेवारी 2024 ला होणार आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लगेचच या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 22 जानेवारीला दुपारी 2 वाजता अभिषेक होईल मग या भव्य-दिव्य मंदिराचे दरवाजे बंद केले जाणार आहेत.
मंदिराचे कपाट बंद झाल्यानंतर 23 जानेवारीला हे कपाट पुन्हा उघडले जाईल आणि तेव्हापासूनच सर्वसामान्यांना या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. दरम्यान हे भव्य दिव्य राम मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर येथे येणाऱ्या रामभक्तांना, भाविकांना, दर्शनासाठी कोणतीही अडचण येऊ नये. राम भक्तांचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे कडून विशेष निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर मंदिर खुले झाल्यानंतर सुरुवातीच्या शंभर दिवसात जगभरातील रामभक्त अयोध्यामध्ये हजेरी लावतील अशी शक्यता आहे. यामुळे भाविकांची होणारी ही संभाव्य गर्दी पाहता भारतीय रेल्वेने देशातील विविध शहरांमधून अयोध्येसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील विविध शहरांमधून जवळपास 1,000 हून अधिक गाड्या चालवण्याची योजना भारतीय रेल्वेने तयार केली असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे या नव्याने सेवेत येणाऱ्या गाड्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या काही दिवस आधीचं सुरू होण्याची शक्यता आहे. 19 जानेवारी 2024 पासून या गाड्या सुरु होतील. या गाड्या प्रवाशांना आरामात अयोध्येला पोहचता यावे यासाठी सुरू केल्या जाणार आहेत.
कोणत्या शहरातून सुरु होणार गाडी
दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूहुन प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीपर्यंत अर्थातच अयोध्येपर्यंत गाड्या सुरू होणार आहेत. वृत्तानुसार, रेल्वेने मागणी लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवण्याची योजना आखली आहे, जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये.
त्याच वेळी, IRCTC देखील केटरिंग सुविधा वेगाने दुरुस्त करण्यात व्यस्त आहे, जेणेकरून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. विशेष म्हणजे अयोध्या रेल्वे स्थानकाची प्रवासी क्षमता ही 50 हजारापर्यंत केली जाणार असून हे काम 15 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल असा दावा केला जात आहे.