Voter ID Card : लोकशाहीचा महा कुंभ लवकरच सजणार आहे. लवकरच आगामी लोकसभेसाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज आगामी 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे.
यानुसार संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात एकूण पाच चरणात मतदान होणार आहे. 26 एप्रिल, 7, 13, 20 आणि 25 मे रोजी आपल्या महाराष्ट्रात मतदान होणार आहे.
यामुळे भारताचे सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकच पात्र नागरिकाला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. भारत हा एक लोकशाही देश असून येथे सर्वसामान्य नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.
असं म्हणतात की, मतदान हे एक श्रेष्ठदान आहे. यामुळे देशाचे भविष्य घडत असते. परिणामी प्रत्येकच पात्र व्यक्तीने मतदान केले पाहिजे. दरम्यान मतदान करण्यासाठी मतदान कार्डाची गरज भासते.
ज्यांच्याकडे मतदान कार्ड असते त्यांना मतदानाचा अधिकार मिळतो. मात्र अनेकांच्या माध्यमातून मतदान कार्ड नसेल तर मतदान करता येईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मतदान कार्ड नसेल तर मतदान करता येणार का?
मतदान कार्ड नसेल तर मतदान करता येऊ शकते मात्र मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या लोकांचे मतदार यादीत नाव असेल त्यांच्याकडे मतदान कार्ड नसले तरी देखील त्यांना मतदान करता येऊ शकते. ज्या लोकांचे मतदार यादीत नाव असेल त्यांना मतदानाच्या वेळी मतदार स्लिप मिळते. ही स्लिप ज्यांना मिळते त्यांनाच मतदान करता येते.
तथापि मतदार यादीत नाव असेल आणि एखाद्याकडे मतदान कार्ड नसेल तर अशावेळी तो व्यक्ती त्याचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र-राज्य सरकार, पीएसयू किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीने जारी केलेले फोटो असलेले आय कार्ड, बँक-पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो असलेले पासबुक, पॅन कार्ड, एनपीआरद्वारे आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, तुमच्या फोटोसह पेन्शन डॉक्युमेंट, खासदार-आमदार आणि आमदारांसाठी जारी केलेले अधिकृत आय कार्ड, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र वापरून मतदान करण्यास पात्र राहणार आहे.
मतदार यादीत नाव नसेल तर काय करणार?
जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव समाविष्ट करावे लागणार आहे. यासाठी तुमचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. म्हणजेच किमान 18 वर्षे वयाचा भारतीय नागरिक मतदानासाठी पात्र ठरतो.
जर तुमचे अठरा वर्षे वय पूर्ण झाले असेल आणि तुमचे मतदार यादीत नाव नसेल तर तुम्हाला नवीन मतदार म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नवीन मतदार म्हणून नोंदणी करू शकता. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला NVSP च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे तुम्हाला फॉर्म 6 भरून सबमिट करायचा आहे. यानंतर तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. तुम्ही फॉर्म-6 भरून तुमच्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करून ऑफलाइन पद्धतीने देखील मतदार यादीत तुमचे नाव समाविष्ट करू शकता.