Voter Id Card : शासकीय तसेच निमशासकीय कामांसाठी विविध सरकारी कागदपत्रांची गरज भासत असते. यामध्ये आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड आणि रेशन कार्डचा प्रामुख्याने समावेश होतो. अलीकडे वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड हे देखील एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे.
मतदान कार्डचा वापर केवळ मतदान करण्यासाठी होतो असे नव्हे तर याचा वापर ओळखपत्राचा पुरावा म्हणून प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये सर्रासपणे केला जातो. या कागदपत्राविना अनेकदा शासकीय कामे अडतात. अशा परिस्थितीत हे कागदपत्र हरवलं तर नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.
नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आज आपण आपल्या वाचक मित्रांसाठी मतदान कार्ड हरवले, फाटले किंवा अन्य काही कारणास्तव मतदान कार्ड खराब झाले तर कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरच मतदान कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते या संदर्भात बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत.
खरंतर आता शासनाच्या माध्यमातून मतदान कार्डधारक नागरिकांच्या सोयीसाठी इलेक्ट्रिकल फोटो आयडी E-Pic ची सुविधा म्हणजे डिजिटल मतदान कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आता अगदी दोन मिनिटात मतदान कार्ड धारकांना डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करता येत आहे.
कसे डाऊनलोड करणार डिजिटल मतदान कार्ड
यासाठी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या मतदाता सेवा पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. यासाठी आपणास https://voters.eci.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर जर तुम्ही आधीच या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. मात्र जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर गेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस करावी लागणार आहे.
जर तुम्ही पहिल्यांदाच वेबसाईटवर गेला असाल तर तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी वापरून तुम्ही या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता.
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. एकदा की ही माहिती तुम्ही भरली की तुम्हाला पुन्हा लॉगिन घ्यावे लागेल.
लॉगिन घेतल्यानंतर तुम्हाला E Pic डाउनलोड असा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता.