Weather Update : महाराष्ट्रात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले. तळकोकणात मान्सून पोहचला आणि भारतीय हवामान विभागाने लगेचच ही गुड न्यूज दिली. मात्र आता राज्यात मान्सूनचे आगमन होऊन जवळपास चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीही मान्सूनने फारशी प्रगती केलेली नाही. मान्सून अजूनही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्येच खिळून बसला आहे.
सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर मान्सूनने मुक्काम ठोकला आहे. चार दिवसाहून अधिकचा काळ मानसून तिथेच असल्याने मात्र शेतकरी हवालदिल झाले आहेत. मान्सूनचे एक तर आधीच राज्यात उशिराने आगमन झाले. जवळपास चार ते पाच दिवस उशिराने राज्यात दाखल झालेला हा मान्सून सध्या कमकुवत आहे. अरबी समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून कमकुवत झाला आहे.
वादळाने हवामानातील आद्रता शोषून घेतली असल्याने मान्सूनला पुढील प्रवास करण्यास अडथळे येत आहेत. यामुळे साहजिकच पेरण्या लांबणार असे चित्र तयार झाले आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून चिंतातूर शेतकऱ्यांची चिंता दूर करणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सून लवकरच जोर पकडणार आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे 23 जून पासून मान्सूनचा जोर वाढणार आहे.
23 जून नंतर संपूर्ण भारतात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज नुकताच आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. निश्चितच पुढील काही दिवस राज्यात पावसाच्या सऱ्या बरसणार असल्याने हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वनव्यामध्ये गारव्याचा अनुभव देणारा सिद्ध होणार आहे.
IMD ने येत्या चार आठवड्याचा विस्तारित श्रेणीचा हवामान अंदाज सार्वजनिक केला. यात 23 जून पासून मध्य भारतात आणि महाराष्ट्रात मोसमी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी 70 ते 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.