Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवामानात सातत्याने बदल नोंदवला जात आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस बरसत आहे.
महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस सुरु आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या काळात नागरिकांची तारांबळ उडत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. अशातच आता पुन्हा एकदा देशातील हवामानात एक मोठा बदल होणार आहे.
हवामान खात्याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचा जोर वाढतोय तर दुसरीकडे दक्षिण भारतात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. आपल्या महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे.
राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात गेल्या चार पाच दिवसापासून अवकाळी पाऊस सुरु आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील हवामान आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार अशी शक्यता वर्तवली आहे. तर काही भागांमध्ये अंशता ढगाळ हवामान कायम राहणार असा अंदाज आहे. पण येत्या काही दिवसांत उत्तर भारतात मुसळधार पाऊस बरसणार आहे.
उत्तर भारतामध्ये या काळात धुके पडणार असेही सांगितले गेले आहे. यामुळे उत्तर भारतातील नागरिकांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार असे चित्र तयार होत आहे. IMD ने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, 14 नोव्हेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
तसेच हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे पश्चिम-वायव्य दिशेने सरकणार आहे आणि 16 नोव्हेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान या चक्रीय स्थितीमुळे 16 नोव्हेंबरपर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
IMD नुसार, आज अंदमान आणि निकोबार बेट, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुडुचेरी, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे गुरुवारपर्यंत या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे.
तसेच या कालावधीमध्ये या संबंधित भागात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वाराही वाहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, खराब हवामानामुळे मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्र किनाऱ्यावर न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
त्याच वेळी, चक्रीवादळाचा प्रभाव उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दिसून येईल. पण हवामान खात्याने कोणत्याही राज्यासाठी इशारा दिलेला नाही. मात्र उत्तर भारतात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.
तसेच हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे थंडी वाढणार असा अंदाज आहे. विशेष बाब अशी की आपल्या महाराष्ट्रातही आता थंडीचा जोर वाढू शकतो असे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसात राज्यातील किमान तापमानात घट येईल आणि थंडीचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.