Weather Update : गेल्या ऑगस्ट महिन्यात पावसाने संपूर्ण महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातील पिके पावसा अभावी करपलीत. ज्या भागातील शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय होती त्यांनी कसेबसे आपले पीक वाचवले आहे. आता खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी आगात कापूस लागवड केली आहे म्हणजे पूर्व हंगामी कापूस लागवड केली आहे त्यांचा कापूस वेचणीसाठी तयार झाला आहे. याशिवाय आगात सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन देखील काढणीसाठी तयार झाले आहे. आगात सोयाबीनची पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून काढणी सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत आता पिकांना पावसाची गरज आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता. मात्र सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबरला राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला.
यानंतर गणेशोत्सवाच्या सुरुवातीला देखील जोरदार पावसाच्या आशा होती मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थातच 19 तारखेला राज्यात फारसा पाऊस पाहायला मिळाला नाही. वास्तविक जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यापैकी दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
आता सप्टेंबर महिन्यात देखील चांगला पाऊस होत नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे. सप्टेंबर महिन्याचा आता शेवटचा आठवडा बाकी आहे. यामुळे या शेवटच्या आठवड्यात तरी जोरदार पाऊस पडावा असे शेतकऱ्यांना वाटतं आहे.
दरम्यान आज अर्थातच 22 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि राजधानी मुंबई वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ विभागातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित विदर्भ, मराठवाडामधील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना आजसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.