Weather Update : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून महाराष्ट्रातील बहुतांशी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागत आहे.
काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस होत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी नागपूर विभागात देखील खूपच पाऊस झाला. नागपूर मध्ये अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला असून तेथे सर्वत्र जलमग्न परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
सामान्य जनजीवन जास्तीच्या पावसामुळे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात नागपुर, नासिक, अहमदनगर, बीड, जळगाव अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे आणि यामुळे जमिनी खरडून निघाल्या आहेत.
अशातच हवामान खात्याने राज्यात पुढील तीन पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आगामी तीन दिवस राज्यातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आगामी तीन दिवस अर्थातच 28 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच अर्थ लाडक्या गणरायाच्या विसर्जनाला देखील यंदा वरूनराज्याची कृपादृष्टी राहणार असल्याचे चित्र आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार आज 25 सप्टेंबर रोजी कोकणातील ठाणे, रायगडमध्ये खानदेशातील जळगांव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच उद्या २६ सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील जळगांव, नाशिक, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच २७ सप्टेंबरला कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच २८ सप्टेंबरला दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.