Weather Update : येत्या सात दिवसात सप्टेंबर महिना संपणार आहे. म्हणजेच मान्सूनचा काळ आता संपत चालला आहे. मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र देशातील बहुतांशी राज्यात अद्याप समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. आपल्या राज्यातही अशीच परिस्थिती आहे.
महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यात जून आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यात अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. फक्त जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला होता. या चालू सप्टेंबर महिन्यात हवामान खात्याने चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. पण सप्टेंबरच्या फक्त दुसऱ्या आठवड्यातील तीन ते चार दिवस चांगला पाऊस झाला आहे.
तसेच 14 सप्टेंबर रोजी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यातील काही भागात पावसाची हजेरी लागली होती. खरतर गणेशोत्सवाच्या काळात जोरदार पावसाची आशा होती. पण तस काही झालं नाही. राज्यातील काही भागात गणेश चतुर्थी पासून पावसाला सुरुवात झाली आहे.
मात्र पावसाचा जोर कमीच आहे. काल-परवा पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस झाला मात्र उर्वरित महाराष्ट्रात अजूनही पावसाचा जोर कमीच आहे. अशातच, भारतीय हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर नंतर पश्चिम राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
खरंतर दरवर्षी मोसमी पाऊस 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेतो आणि 15 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशातून मान्सून परततो. यंदा मात्र परिस्थिती भिन्न आहे. यावर्षी परतीच्या पावसाला उशिराने सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात 22 सप्टेंबर पर्यंत देशात सरासरी 94 टक्के पाऊस झाला आहे.
देशात संपूर्ण पावसाळ्यात सरासरी 832.4 मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र प्रत्यक्षात ७८०.३ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे देशातील बहुतांशी भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात 5 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज म्हणजे 23 सप्टेंबर रोजी राज्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
पण आज मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उद्यापासून अर्थातच 24 सप्टेंबर पासून ते 26 सप्टेंबर दरम्यान राज्यातील मुंबईसह संपूर्ण कोकण, संपूर्ण खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील नासिक अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून 26 पर्यंत या संबंधित भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो असे सांगितले गेले आहे.