Jowar Farming : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरीप हंगामात नेहमीप्रमाणेच यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी अशा विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे.
यावर्षी भारतीय हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, पीक लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असा अंदाज देण्यात आला आहे. खरंतर, ज्वारी हे एक प्रमुख तृणधान्य पीक आहे.
या तृणधान्य पिकाची राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात लागवड केली जाते. दरम्यान आज आपण खरीप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त ज्वारीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया ज्वारीच्या काही संकरित जाती.
ज्वारीच्या प्रमुख संकरित जाती कोणत्या?
सी.एस.एच-१४ : ज्वारीची ही महाराष्ट्रात उत्पादित होणारी एक प्रमुख संकरित जात आहे. या जातीची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, ज्वारीच्या या संकरित जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 40 ते 45 क्विंटल धान्याचे उत्पादन मिळते. या जातीचे पीक अवघ्या 100 ते 105 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होते. विशेष म्हणजे या जातीचे पीक पावसात सापडले तरी देखील शेतकऱ्यांना यापासून चांगले उत्पादन मिळते. हेच कारण आहे की कृषी तज्ञ या जातीची लागवड करण्याचा सल्ला देतात.
सी.एस.एच.-१६ : ज्वारीची ही देखील एक सुधारित जात असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या जातीची लागवड होत आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची मध्यम ते भारी जमिनीत लागवड करता येणे शक्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जातीचे पीक अवघ्या 105 ते 107 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होते. विशेष म्हणजे यादेखील जातीपासून शेतकऱ्यांना 40 ते 42 क्विंटल प्रतिहेक्टर पर्यंत चे उत्पादन मिळत आहे. या जातीपासून कडब्याचे देखील चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येते. परिणामी राज्यातील अनेक पशुपालक शेतकरी या जातीची लागवड करत आहेत.
ज्वारीचे सीएसएच- २५ : ज्वारीचा हा देखील एक सुधारित प्रकार आहे. या जातीला परभणी साईनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते. ज्वारीच्या या जातीची खरीप हंगामात लागवड करता येणे शक्य आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हे वाण उंच वाढणारे आहे आणि या जातीचे पीक अवघ्या शंभर दिवसांच्या कालावधीत परिपक्व होत आहे. विशेष बाब म्हणजे या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळत आहे या वाणापासून प्रतिहेक्टरी ४३.३ क्विटल धान्य उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीपासून कडब्याचे देखील चांगले उत्पादन मिळते.