Agriculture News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.
अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान केले आहे. या पावसामुळे आणि अचानक झालेल्या गारपीटीमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, रांगडा-लाल कांदा, तूर, कापूस तसेच रब्बी हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे दुष्काळामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिसकावून घेतला आहे. खरे तर यावर्षी मानसून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात खूपच कमी पाऊस झाला. कमी पावसामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळालेले नाही. कापूस, सोयाबीन यांसारख्या अनेक पिकांच्या उत्पादनात घट आली आहे. अशातच आता रब्बी हंगामात देखील पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे.
त्यामुळे आधी दुष्काळ आणि बेजार झालेल्या आणि आता अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मोठी मागणी केली आहे.
सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट करत ही मागणी केली आहे. सुळे यांनी म्हटल्याप्रमाणे, “महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणिबाणीची परिस्थिती आहे. या अशा कठिण काळात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांसाठी मदतीची आग्रही मागणी करायला हवी.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात आदरणीय पवार साहेब केंद्रीय कृषिमंत्री असताना देशाच्या कोणत्याही भागात अशी परिस्थिती उद्भवली तर तेथे केंद्र सरकारचे पथक जाऊन पाहणी करीत असे आणि त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जात असे. आता देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करायला हवा.
यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची देखील पाहणी करण्याची मागणी करावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्याला पुन्हा उभा करण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल ते करायला हवे. राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची ही वेळ आहे.
एकंदरीत आधी दुष्काळामुळे आणि आता अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मोठी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यामुळे आता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस-पवार सरकार भरीव मदत देते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.