7th Pay Commission : गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी DA वाढ लागू केली. महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली.
46 टक्क्यांवरून महागाई भत्ता 50 टक्के एवढा करण्यात आला. म्हणजेच यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली. विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली. याचा रोख लाभ मात्र मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला गेला.
मार्च महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळाली. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यामुळे मुलांचा शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदान देखील वाढवण्यात आले आहे.
कार्मिक मंत्रालयाने याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे. सदर शासन आदेशानुसार, मुलांचा शिक्षण भत्ता म्हणून प्रति महिना २,८१२.५ रुपये आणि वसतिगृह अनुदान ८,४३७.५ रुपये प्रति महिना दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे हा बदल एक जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. म्हणजेच सुधारित झालेला मुलांचा शिक्षण भत्ता आणि सुधारित वस्तीगृह अनुदानाची रक्कम हे जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे.
सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदान 2018 मध्ये जारी झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुधारित केले आहे.
या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा मुलांचा शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदान 25 टक्क्यांनी वाढवले पाहिजे. यानुसार कार्मिक मंत्रालयाने आदेश निर्गमित करत मुलांचा शिक्षण भत्ता आणि वस्तीगृह अनुदान वाढवले आहे.
एवढेच नाही तर महागाई भत्ता 50% झाला असल्याने घर भाडे भत्ता देखील वाढवण्यात आला आहे. घर भाडे भत्ता हा एक्स, वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के असा दिला जाणार आहे.