7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के एवढा झाला आहे. आधी हा भत्ता 46% एवढा होता.
विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. याचा रोख लाभ मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगारासोबत अर्थातच एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात जो पगार येईल त्या पगारांसोबत मिळणार आहे.
महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम केंद्रीय कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार आहे. यामुळे होळी सणाच्या पूर्वीच केंद्रिय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर अनेक राज्य सरकारांनी देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच वाढवला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवण्यात आला आहे.
एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्यातील मुंबई महापालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे.
हा देखील महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासूनच लागू करण्याचा निर्णय बीएमसीने घेतलेला आहे. बीएमसीमधील कर्मचाऱ्यांना देखील मार्च महिन्याच्या पगारासोबतच याचा रोख लाभ मिळणार आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे.
याशिवाय आता अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा देखील निर्णय नुकताच झाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून 13 मार्च 2024 ला प्राप्त झालेल्या केंद्रीय ज्ञापनाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.
म्हणजेच केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या वेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा शासन निर्णय काल अर्थातच 19 मार्चला निर्गमित झाला आहे. या सदर सेवानिवृत्त वेतनधारकांना तथा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना देखील आता 50 टक्के महागाई भत्ता लागू राहणार आहे. हा लाभ या सदर मंडळीला देखील जानेवारी 2024 पासूनच मिळणार आहे.