8th Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाची भेट देणार अशा चर्चा आहेत.
केंद्र सरकारने मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला असून सरकार दरबारी सध्या तरी असा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय वित्त विभागाचे सचिव टी व्ही सोमनाथन यांनी केंद्रातील मोदी सरकार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या विचारात नसल्याचे सांगितले आहे.
याबाबतचा कोणताच प्रस्ताव केंद्राकडे विचाराधीन नाहीये. अशातच आता काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणार नाही मात्र एका विशिष्ट फॉर्मुलानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर 1947 मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाला.
त्यानंतर दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे. सातवा वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर हा वेतन आयोग 2016 मध्ये कर्मचाऱ्यांना लागू झाला आहे. यासाठी मात्र 2014 मध्ये वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
अशा परिस्थितीत आता वेतन आयोगाच्या मागील ट्रेंडनुसार विचार केला तर 2026 पर्यंत नवीन आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना बहाल होणे अपेक्षित आहे.त्यासाठी या चालू वर्षात अर्थातच 2024 अखेरपर्यंत आठवा वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणे अपेक्षित आहे.
मात्र केंद्र शासनाने आठवा वेतन आयोग लागू करणेबाबत सध्या केंद्राचा कोणताच प्रस्ताव नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आता मीडिया रिपोर्ट्स मध्ये सरकार आठवा वेतन आयोग लागू करणार नाही मात्र नवीन फॉर्मुलानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणार असे वृत्त झळकू लागले आहे.
कसे वाढणार वेतन ?
येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी वेतन आयोगाऐवजी वेगळा फॉर्म्युला आणण्याची तयारी सुरू आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, अर्थ मंत्रालय कर्मचार्यांचे पगार त्यांच्या कामगिरीच्या आधारे वाढवण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला म्हणजे सूत्र लागू करण्याचा विचार करत आहे.
हा फॉर्म्युला कसा असावा याबाबत सध्या केंद्र शासनाच्या माध्यमातून विचार केला जात आहे. खरे तर सहा वर्षांपूर्वी दिवंगत माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वेतन आयोग ऐवजी नवीन फॉर्मुला आणण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
तेव्हापासून या फॉर्मुल्यावर मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान अरुण जेटली यांच्या याच फॉर्मुलाच्या आधारावर आता भविष्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन वाढेल असे म्हटले जात आहे.
कसा राहणार नवीन फॉर्म्युला
आठवा वेतन आयोग लागू करण्याऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी नवीन फॉर्मुला आणला जाणार आहे. या नव्या फॉर्म्युल्यात कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्त्याला आधार बनवले जाऊ शकते.
कर्मचार्यांचा डीए 50 टक्क्यांनी वाढताच त्यांच्या पगारात आपोआप वाढ करण्याचे सूत्र स्वीकारले जाऊ शकते. या फॉर्म्युलाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाहीये. पण या नवीन फॉर्म्युल्याचा सर्वाधिक फायदा छोट्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना होणार असे बोलले जात आहे आहे.