Aadhar Card Name Change : सध्या संपूर्ण भारतभर लग्नाचा हंगाम सुरू आहे. लग्नसराईच्या या काळात आज आपण नवविवाहित दांपत्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव कसे बदलायचे याविषयी जाणून घेणार आहोत. खरे तर आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे.
या कागदपत्राविना भारतात कोणतेच काम करता येऊ शकत नाही. आधार कार्ड भारतीय नागरिकांचा एक प्रमुख ओळखीचा पुरावा आहे. याशिवाय आधार कार्डचा वापर विविध ठिकाणी केला जातो. प्रत्येक शासकीय तथा निमशासकीय कामांमध्ये याचा वापर होतो.भारतात आधार कार्ड विना साधे एक सीम देखील काढले जाऊ शकत नाही.
आधार कार्डचा वापर पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड काढण्यासाठी देखील होतो. बँकेत अकॉउंट ओपन करण्यासाठी, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा वापर होतो.
मात्र जेव्हा मुलींचे लग्न होते तेव्हा त्या नववधूचे आधार कार्ड वरील नाव चेंज करावे लागते. दरम्यान, हे नाव कसे चेंज करायचे यासंदर्भात अनेकांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती. त्यामुळे आज आपण लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव कसे बदलायचे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणकोणती कागदपत्रे लागतात
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी, व्यक्तींना त्यांचे नवीन नाव दर्शविणारा ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. यामध्ये विवाहाचे प्रमाणपत्र, लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची प्रत किंवा लग्नमंडपाचे प्रमाणपत्र समाविष्ट असू शकते. तसेच नावातील बदल दर्शविणारी राजपत्र अधिसूचना देखील स्वीकारली जाते.
ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड वरील नाव कसे बदलणार
तुम्ही तुमच्या आधार कार्ड वरील नाव ऑनलाइन देखील बदलू शकता. आधार कार्डवर तुमचे नाव बदलण्याची ऑनलाइन प्रक्रिया खूपच सोयीची आणि सोपी आहे. यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
येथे तुम्हाला अपडेट आधार पर्याय निवडावा लागेल आणि आधार अपडेट विनंती विभागात जावे लागेल. तुमचा आधार क्रमांक वापरून लॉग इन केल्यानंतर तुम्ही “नाव” पर्याय निवडू शकता आणि तुम्ही तुमचे नवीन नाव कार्डवर जसे दिसायला हवे तसे प्रविष्ट करू शकता.
यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर यु आर एन नंबर जनरेट होईल. हा नंबर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासताना लागणार आहे. यासाठी तुम्हाला नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे.
ऑफलाइन पद्धतीने नाव कसे बदलणार
तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊ शकता आणि आधार अपडेट/सुधारणा फॉर्म भरू शकता. आपण आपले नवीन नाव योग्यरित्या प्रविष्ट केले आहे याची खात्री करा आणि आवश्यक दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित प्रत प्रदान करा.
येथे केंद्रावरील सेवा ऑपरेटर तुमची विनंती सबमिट करेल आणि तुम्हाला URN असलेली एक स्लिप मिळेल. तुमच्या आधार कार्डची स्थिती जाणून घेण्यासाठी हा क्रमांक महत्त्वाचा राहणार आहे. यासाठी तुम्हाला नाममात्र शुल्क देखील भरावे लागणार आहे.