Aadhar Card Update : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांना दिले जाणारे एक महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे. यांचा वापर जवळपास प्रत्येकच शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये केला जातो. अनेक ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक देखील करण्यात आले आहे. भारतात साधे एक सिम काढायचे असेल तरीदेखील आधार द्यावे लागते.
याशिवाय शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आधार कार्ड लागते. तसेच पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी कागदपत्र काढण्यासाठीही यांचा वापर केला जातो. एवढेच नाही तर ओळख पुरावा म्हणून अन विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
आधार कार्डमध्ये संबंधित कार्डधारक व्यक्तीची बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती असते. Aadhar Card हे वित्तीय कामकाजासाठी देखील वापरले जाते. याचा वापर पैसे काढण्यासाठी देखील होतो.
अशा परिस्थितीत आधारचा गैरवापर होण्याची शक्यता देखील अधिक बळावली आहे. हेच कारण आहे की, आपण आधार कार्ड वापरतांना काळजी घेतली पाहिजे. पण, जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुमच आधार कुठे वापरल गेल आहे, तर तुम्ही तुमच्या आधारचा इतिहास तपासू शकणार आहात.
तुमच आधार कार्ड नेमके कुठे वापरले गेले आहे याची माहिती तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. यामुळे तुमचे आधार कार्डचा काही गैरवापर झाला आहे की नाही याबाबत तुम्हाला माहिती मिळू शकणार आहे.
कसं चेक करणार ?
तुमच्या आधार कार्डचा वापर नेमका कुठे झाला आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. uidai.gov.in ही UIDAI ची अधिकृत वेबसाईट आहे.
तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे याची माहिती जाणून घेऊ शकणार आहात. यासाठी तुम्हाला वेबसाईटवर भेट दिल्यानंतर माय आधार या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
जिथे तुम्हाला ‘Aadhaar Authentication History’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागणार आहे आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरावा लागणार आहे.
यानंतर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. आता नंबरवर मिळालेला OTP टाका, त्यानंतर एक नवीन टॅब उघडेल.
येथे तुम्हाला ती तारीख भरावी लागणार आहे ज्या तारखेपासून तुम्हाला आधार कार्डचा इतिहास तपासायचा आहे. यानंतर मग तुमच्या स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचा इतिहास दिसणार आहे.