Agriculture Business Idea In Marathi : अलीकडे सुशिक्षित नवयुवक तरुणांची शेती व्यवसायातून केवळ पोट भरू शकत, यातून लाखोंची कमाई होऊ शकत नाही अशी धारणा बनली आहे. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या नवयुवक तरुणांना देखील असच वाटत आहे.
पण जर सुयोग्य नियोजन करून आणि बाजाराचा आढावा घेऊन शेती केली तर शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई सहजतेने होऊ शकते. हे अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. शेतकऱ्यांनी जर बाजारात ज्या पिकाला मागणी आहे त्या पिकाची लागवड केली तर त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकऱ्यांनी केवळ पारंपारिक पिकांची शेती करू नये तर त्यांनी फुल पीक, फळपीक यांसारख्या नगदी पिकांची शेती केली पाहिजे. दरम्यान, आज आपण गुलाबाच्या शेतीबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर गुलाबाच्या फुलाला कायमच बाजारात मोठी मागणी असते. या फुलाला फुलांचा राजा म्हणून संबोधलं जातं.
गुलाबाचा सुगंध आणि सुंदरता अप्रतिम आहे. यामुळे या फुलाचा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. लग्नसराई मध्ये या फुलाला बाजारात मोठी मागणी असते. लग्नात सजावटीसाठी, वधू-वरांच्या गळातील पुष्पहारासाठी, घर सजवण्यासाठी, मंडप डेकोरेट करण्यासाठी, वधू-वरांची गाडी डेकोरेट करण्यासाठी या फुलाची मोठी मागणी असते.
याव्यतिरिक्त आमदार खासदारांच्या कार्यक्रमाला, तसेच कुणाचा सत्कार करताना, इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या डेकोरेशनसाठी, घरात असणाऱ्या छोट्या फंक्शन साठी, शाळा कॉलेजेस मध्ये असणाऱ्या ग्यादरिंग साठी, छोटा मोठा पुरस्कार सोहळा आयोजित झाला असेल तर या पुरस्कार सोहळ्याला डेकोरेट करण्यासाठी आणि पुरस्कार देताना पुष्पगुच्छ देण्यासाठी गुलाबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एकंदरीत गुलाबाची फक्त लग्न सराईतच मागणी असते असे नाही तर इतर काळातही या फुलाला सजावटीसाठी खूप मागणी असते. गुलाबाचे फुल देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कायमच मागणीत राहते. यामुळे गुलाबाची शेती करून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते.
गुलाब शेतीमधील काही महत्त्वाच्या बाबी
या फुलाची देशातील विविध राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यात या फुलाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गुलाबाची लागवड मोकळ्या शेतातही केली जाऊ शकते. पण जर ग्रीन हाऊस किंवा पॉलिहाऊस मध्ये या फुलाची लागवड केली तर उत्पादन चांगले मिळते. विक्रमी उत्पादन तर मिळतेच शिवाय फुलाचा दर्जा देखील चांगला राहतो.
यामुळे पॉलिहाऊस मध्ये लागवड केल्यास उत्पादित झालेल्या गुलाबाला बाजारात चांगली मागणी आणि भाव मिळतो. गुलाबाच 15°c ते 28 अंश सेल्सिअस तापमानात चांगले बहरते. गुलाब पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पिकाला पाच ते सहा तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सोबतच या पूल पिकाला जास्त ऊन, जास्तीचा पाऊस आणि जास्तीचा वारा सहन होत नाही.
यामुळे गुलाबाची लागवड पॉलिहाऊस मध्ये करण्याचा सल्ला दिला जातो. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या जमिनीतील मातीचा पीएच 6 ते 7.5 असतो अशा जमिनी गुलाबाच्या लागवडीसाठी फायदेशीर असतात. अशा जमिनीत गुलाबाची लागवड केल्यास उच्च उत्पादन मिळते. तसेच उच्च सेंद्रिय पदार्थ असलेल्या वालुकामय चिंब जमिनीत गुलाब लागवड अधिक फायदेशीर राहते. या जमिनीत वनस्पती चांगल्या वाढतात.
जर नर्सरीतून गुलाबाची रोपे मागवलीत तर गुलाबाची रोपे घरी आणली की लगेचच याची लागवड करावी. तसेच गुलाबाची कलमे ही लागवड करताना 60 ते 70 सेंटीमीटर खोलीवर लागवड करावी. गुलाबाची लागवड शक्यतो सायंकाळी करावी. गुलाबांच्या झाडाची वर्षातून एकदा छाटणी करावी लागते. नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ गुलाब छाटणी करण्यासाठी योग्य असतो.
गुलाबाच्या फुलांसाठी रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा. सेंद्रिय खतांचा वापर करूनही या पिकातून चांगले उत्पादन मिळते. जरी रासायनिक खतांचा वापर करायचे ठरवले तरीदेखील तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन आणि संतुलित प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करणे आवश्यक राहते. गुलाब लागवड केल्यानंतर एका वर्षांनी याला फुले लागतात. छाटणी केल्यानंतर साधारणता 45 ते 50 दिवसात नवीन फुलधारणा होते.