Ahmednagar District Division : गेल्या तीन दशकांपासून अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा वेळोवेळी उभा राहत असतो. मात्र या मुद्द्यावर अद्याप कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. परंतु महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी आवश्यक पूर्वतयारीचे काम हाती घेतले असल्याचे बोलले जात आहे.
वर्तमान शिंदे सरकारने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अहमदनगरचे नामांतरण करण्याची घोषणा केली आहे. अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर असे नामांतरण करण्याचे शिंदे सरकारने जाहीर केले आहे. याबाबत सरकार दरबारी कारवाई सुरू असतानाच शिंदे सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला.
तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यासाठी नवीन अप्पर जिल्हाधिकारी हे पद मंजूर करण्यात आले आहे. तसेच याचे कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डी करण्याचा डाव विखे पाटलांनी साधला असल्याच्या चर्चा अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
अशातच शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे काल अर्थातच 15 सप्टेंबर 2023 ला विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन समारोह कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार सदाशिव लोखंडे यांनी भूषवले. दरम्यान यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार लोखंडे व आमदार आशुतोष काळे यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली.
विशेष म्हणजे या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाबाबत अतिशय महत्त्वाचे आणि मोठे भाष्य केले आहे. विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेईल.
विखे पाटलांच्या या सुतोवाचामुळे आणि गेल्या काही महिन्यांपासून वर्तमान शिंदे सरकारने अहमदनगर जिल्ह्यासंदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयामुळे हे सरकार अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे विभाजन करून नवीन जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डीला हलवण्याच्या चर्चा खऱ्या ठरणार की काय? अशा आशयाच्या नवीन चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत.
तूर्तास याबाबत काहीही सांगणे थोडे घाईचेच होईल मात्र खुद्द महसूलमंत्र्यांनी तेही शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे सांगितले असल्याने नवीन जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डीलाच हलवले जाऊ शकते, असे देखील मत काही तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान महसूल मंत्री विखे पाटील यांनी शिर्डीत अद्यावत महसूल भावनांसाठी जागा व 100 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय शेती महामंडळाची 500 एकरची जागा एमआयडीसीसाठी दिली असून येत्या सहा महिन्यात याच्या कामाला गती मिळणार आहे.
तसेच या ठिकाणी उद्योग उभारणीसाठी महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स यांसारख्या अनेक नामांकित कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती देखील मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली आहे. शिर्डीतील या नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा अहमदनगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांना डायरेक्ट फायदा मिळणार आहे. कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या सहा तालुक्यांना या नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.