Ahmednagar News : अहमदनगर हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. जिल्ह्याचे आकारमान मोठे असल्याने जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या नागरिकांना मुख्यालयी जायचे असेल तर अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा मुख्यालयाला जर काही काम असेल तर एक संपूर्ण दिवसाचा वेळ खर्च करावा लागतो.
यामुळे जिल्ह्याचे विभाजन करून जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. ही मागणी आत्ताच होत आहे असे नाही तर जिल्हा विभाजनाची ही मागणी जवळपास तीन दशक जुनी आहे. तीस वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी जोर पकडत आहे. दरम्यान शिंदे फडणवीस सरकारने नुकताच नगरचे नामांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असे नामकरण करण्याची घोषणा शासनाने केली आहे. शिवाय राज्य सरकारने जिल्ह्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी हे पद मंजूर केले आहे. विशेष बाब अशी की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता आणि विखे पाटील यांच्याच पाठपुराव्यामुळे अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे राज्य सरकारने नगरचे नामांतरण केले आणि आता अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत सुरू झाले आहे. यामुळे हा केवळ योगायोग नसून जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केल्या असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. एकूणच काय जिल्हा विभाजनाची तीन दशकांपेक्षा जुनी मागणी राज्य शासनाच्या या दोन निर्णयामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
खरंतर, अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे यासाठी सर्वांमध्ये सार्वमत आहे. पण जिल्हा विभाजन झाल्यानंतर मुख्यालय संगमनेर, श्रीरामपूर की शिर्डी नेमके कुठे होणार यावरून वाद आहे. या तीनही ठिकाणाच्या नागरिकांच्या माध्यमातून मुख्यालय आपल्याच शहरात झाले पाहिजे अशी मागणी आहे. यासाठी जिल्हा कृती समित्या स्थापित झाल्या आहेत.
या समित्यांना अनेक राज्यकर्त्यांनी पाठिंबा दाखवला आहे. अशातच, नगरचे नामांतरण केल्यानंतर आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याने शिर्डी येथे नवीन जिल्ह्याचे मुख्यालय सुरू होणार की काय? असा प्रश्न सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ताकतवार नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. थोरात यांनी सांगितल्याप्रमाणे, नव्याने जिल्हा विभाजन करणे शक्य नाहीय. त्यांनी मी महसूल मंत्री असताना राज्यातील ठाणे जिल्ह्यातून पालघर हा स्वतंत्र जिल्हा तयार केल्याचे सांगितले.
यासोबतच त्यांनी त्यावेळेसच नवीन जिल्ह्याची निर्मिती करणे हे प्रशासनाच्या दृष्टीने मोठे जिकरीचं काम असल्याने यापुढे नव्याने कोणत्याही जिल्ह्याची निर्मिती न करण्याचा निर्णय झाल्याची माहिती देखील यावेळी दिली आहे. तसेच त्यांनी याबाबत पुढे बोलताना सांगितले की, एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी जवळपास 56 वेगवेगळ्या प्रकारचे कार्यालय त्या ठिकाणी असावी लागतात. त्यासाठी मोठ्या इमारती, अधिकारी, इतर कर्मचारी वर्ग अशी मोठी व्यवस्था उभी करावी लागते.
ज्या जिल्ह्यांचे नव्याने निर्मिती केली त्या ठिकाणीच अजून पर्यंत पूर्णपणे व्यवस्था देता आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आता नव्याने जिल्हा निर्मिती करणे सरकारला शक्य नाही असे यावेळी स्पष्ट केले आहे. एकूणच अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणे जवळपास अशक्य बाबा असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सध्या अहमदनगर जिल्हा विभाजनाचा चर्चेत आलेला हा मुद्दा यावेळी निकाली निघणार की नेहमीप्रमाणेच हा मुद्दा केवळ मुद्दा बनून राहणार हे पाहणे विशेष खास राहणार आहे.