Ahmednagar Onion Market Price : गेल्या अनेक महिन्यांपासून दबावात असलेला कांदा बाजार आता तेजीत आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. खरंतर कांदा बाजारातील लहरीपणा हा काही नवा नाही.
मात्र या चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत म्हणजे जवळपास पाच महिन्यांच्या काळात कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला गेला. जानेवारी महिन्यात चांगल्या मालाला बऱ्यापैकी भाव मिळत होता.
पण फेब्रुवारी महिन्यापासून दरात घसरण सुरू झाली. जून महिन्यापर्यंत याचा बाजार दबावातच होता. खरीप हंगामातील लाल आणि लेट खरीप हंगामातील रांगडा तसेच रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा देखील सुरुवातीच्या टप्प्यात खूपच कमी दरात विकला गेला.
परिस्थिती एवढी खराब बनली होती की अनेक शेतकऱ्यांना पिक उत्पादीत करण्यासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. मात्र आता जुलै महिन्यात ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
कांदा दरात समाधानकारक वाढ झाली आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. काल झालेल्या लिलावात देखील कांद्याला चांगला बाजार भाव मिळाला आहे.
काल अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नंबर एक कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळाला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राहता एपीएमसी मध्ये काल सोळा हजार 639 कांदा गोणींची आवक झाली.
यात प्रतवारीनुसार दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे. यात नंबर 1 मालाला 1600 ते 2000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे. तसेच 2 नंबर मालाला 950 ते 1550 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
याव्यतिरिक्त, नंबर 3 मालाला 400 ते 900 रुपये, गोल्टी 800 ते 1000 रुपये आणि जोड म्हणजे बेल्या कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला आहे. आता कांदा बाजारात तेजी आली असल्याने आगामी काळात यात आणखी वाढ होईल अशी आशा देखील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.