Ahmednagar Onion Rate : गेल्या 25 ते 30 दिवसांपासून राज्यात कांद्याला चांगला समाधानकारक असा दर मिळत आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर, मान्सूनच्या उशिरा आगमनाने आणि सुरुवातीच्या टप्प्यात कमकुवत मान्सूनमुळे शेतकरी बांधव संकटात आले होते.
शिवाय गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसाने अनेक भागातील शेती पिके नेस्तनाभूत झाली असल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. अनेक भागात जास्तीच्या पावसाने पिके खराब झाली असल्याने पेरणीसाठी आलेला हजारो रुपयांचा खर्च आणि मेहनत वाया जाणार असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत कांद्याला देखील अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. पण या चालू महिन्यात अगदी सुरुवातीपासूनच कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात 1 हजार 200 ते 1 हजार 500 दरम्यान सरासरी भाव मिळू लागला आहे. काही बाजारात याहीपेक्षा अधिक दर मिळत आहे. विशेष म्हणजे कमाल बाजार भावाने अनेक बाजारात 2500 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. तर काही बाजारात कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा कमाल दर मिळत आहे.
काल अर्थातच 30 जुलै 2023 रोजी झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. राहता एपीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, काल 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव कांद्याला मिळाला आहे.
काल या एपीएमसी मध्ये 15,418 गोणी कांद्याची आवक झाली. यात एक नंबर कांद्याला 1700 ते 2200 रुपये, 2 नंबरला 950 ते 1650 रुपये, 3 नंबरला 400 ते 900 रुपये आणि गोल्टी कांद्याला 900 ते 1300 रुपये असा भाव मिळाला आहे. तसेच जोड कांद्याला 100 ते 300 रुपये प्रतिक्विंटल असा दर नमूद करण्यात आला आहे.