Ahmednagar Onion Rate : सध्या राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे बळीराजाला तब्बल सहा ते सात महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. खरंतर जानेवारी महिन्याच्या अखेर पासून विशेषतः फेब्रुवारी 2023 पासून नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात सातत्याने घसरण नमूद केली जात होती.
फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये चांगल्या दर्जाच्या कांद्याला देखील पाच ते सहा रुपये प्रति किलोचा भाव मिळत होता. विशेष म्हणजे फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्याच्या काळात कांदा मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो अशा कवडीमोल बाजारभावात विकला गेला. मात्र जुलै महिन्याची सुरुवात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचा दरात सुधारणा पाहायला मिळत आहे.
राज्यातील प्रमुख कांदा बाजारपेठेत दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत. राज्यातील नासिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारात कांदा दरात तेजी आली आहे. काल झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केट मध्ये कांद्याच्या बाजारभावात दोनशे रुपयांची वाढ नमूद करण्यात आली.
काल अर्थातच 15 जुलै 2023 रोजी झालेल्या लिलावात घोडेगाव बाजारात 62 हजार 885 गोणी कांदा आवक झाली. कालच्या लिलावात या मार्केटमध्ये एक-दोन नंबरच्या कांद्याला 1600 ते 1850 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1350 ते 1550 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1150 ते 1300 रुपये, गोल्टा कांद्याला 850 ते 1200 रुपये, गोल्टी कांद्याला 600 ते 700 रुपये, जोड म्हणजे बेल्या कांद्याला 250 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला म्हणजे खाद कांद्याला 300 ते 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.
अर्थातच काल झालेल्या लिलावात कांद्याला १८५० रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. निश्चितच कमाल बाजारभावात काल दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ झाली असल्याने आगामी काळात दरात आणखी वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आता वाटू लागली आहे.