Ahmednagar Success Story : अलीकडे शेतीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून चांगले उत्पादन मिळवणे आता आव्हानात्मक बनले आहे.
विशेष म्हणजे या आव्हानांचा सामना करून जर चांगले उत्पादन मिळाले तर अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही. यंदा देखील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला आहे. यंदा महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
गेल्या महिन्यात राज्यातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. पण राज्यात असे काही भाग आहेत जिथे अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. दरम्यान या दुष्काळी परिस्थितीमध्ये एक कौतुकास्पद असे उदाहरण समोर येत आहे ते अहमदनगर मधून.
अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने दुष्काळी संकटांचा यशस्वी सामना करत कोथिंबीर पिकांमधून अवघ्या 45 दिवसांच्या काळात लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.
अकोले तालुक्यातील निलेश माळुंजकर या प्रयोगशील शेतकऱ्याने त्यांच्या एक एकर जमिनीवर कोथिंबीरची लागवड केली होती. लागवड केल्यानंतर मात्र दीड महिन्यांच्या काळात त्यांना या एक एकर कोथिंबीर पिकातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
कोथिंबीर पिकाने त्यांना चांगले मालामाल केले आहे. निलेश यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी कोथिंबीरची लागवड 31 ऑगस्ट रोजी केली होती. त्यांनी पेरणीसाठी गौरी वाणाचे बियाणे वापरले. त्यांना जवळपास 35 किलो बियाणे लागले. तसेच पेरणीपासून ते काढणीपर्यंत त्यांना 35,000 चा खर्च आला.
पेरणीनंतर 45 दिवसांनी पीक तयार झाले आणि व्यापाऱ्याने जागेवरच त्यांचा माल खरेदी केला. तीन लाख रुपयांना ही कोथिंबीर विकली गेली आणि त्यांना दोन लाख 65 हजार रुपयांचा निव्वळ नफा राहिला. निश्चितच एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे निलेश यांनी बाजाराचा अंदाज घेऊन आणि दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेऊन कोथिंबीर पिकाची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे यात शंकाच नाही.