Atal Pension Yojana : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत असते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शन मिळत नाही. मात्र असंघटित क्षेत्रातील लोक सरकारी पेन्शन योजनेत गुंतवणूक करून पेन्शन मिळू शकतात. आज आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या सरकारी पेन्शन योजनेची माहिती पाहणार आहोत, त्यामध्ये दररोज सात रुपये वाचवून पैसे गुंतवलेत तर वृद्धापकाळात दर महिन्याला फिक्स पेन्शन मिळत असते. ही निवृत्ती वेतनासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेत तुम्हाला नाममात्र प्रीमियम भरावा लागतो. या योजनेला अटल पेन्शन योजना म्हणून ओळखले जात आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. सरकारने 2015-16 मध्ये ही योजना सुरू केली आहे.
या योजनेत आत्तापर्यंत लाखो गुंतवणूकदारांनी अर्ज केला आहे. या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराला वयाच्या ६० व्या वर्षापासून एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि पाच हजार रुपये दरमहा खात्रीशीर पेन्शन मिळते.
पण, पेन्शनची रक्कम ही ग्राहकाने गुंतवलेल्या पैशांवर अवलंबून असते. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक सहभाग नोंदवू शकतात.
म्हणजे चाळीसव्या वर्षी या योजनेत सहभाग नोंदवला तर वीस वर्ष गुंतवणूक करावी लागणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराकडे बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे बँकेत सेविंग अकाउंट असायला हवे किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सेविंग अकाउंट असायला हवे.
दिवसाला 7 रुपये वाचवले तर पाच हजाराची पेन्शन मिळणार
अटल पेन्शन योजनेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभाग नोंदवला आणि महिन्याकाठी 210 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक पाच हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
म्हणजेच दिवसाला फक्त सात रुपये वाचवून महिन्याकाठी पाच हजार रुपयांची पेन्शन घेता येणार आहे. जर समजा अठराव्या वर्षापासून एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत महिन्याला 42 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 60 वर्षानंतर मासिक एक हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
नवरा-बायको दोघांना मिळणार का पेन्शनचा लाभ
अटल पेन्शन योजनेचा लाभ नवरा आणि बायको दोघांनाही घेता येऊ शकतो. म्हणजेच जर पती आणि पत्नी दोघांनी या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर त्यांना प्रत्येकी 5000 रुपयांपर्यंतची पेन्शन मिळवता येणार आहे.
म्हणजेच 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांना दहा हजार रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहे. जर समजा या दोघांपैकी एकाच मृत्यू झाला तर पेन्शनची रक्कम जोडीदाराला दिली जाणार आहे. दोघांचाही मृत्यू झाला तर योजनेचा सर्व पैसा नॉमिनीला मिळू शकणार आहे.