Bank Account Close : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात तळागाळातील व्यक्ति देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडला गेला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात भारतात बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. मोदी सरकारने जनधन योजना सुरू केल्याने बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, रस्त्यावरील विक्रेते, महिला, विद्यार्थी अशा विविध वर्गातील लोक आता बँकेशी जोडले गेले आहेत.
यामुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत अधिक सोपे झाले आहेत. दरम्यान, देशातील काही बँक खातेधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही अपडेट पंजाब नॅशनल बँकेतील खातेधारकांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. जर तुमचेही अकाउंट पंजाब नॅशनल बँकेत असेल तर तुमच्यासाठी बँकेने एक अलर्ट जारी केला आहे.
खरेतर, पीएनबीने अशा ग्राहकांना, खातेधारकांना अलर्ट जारी केला आहे ज्यांच्या खात्यात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही आणि त्यांच्या खात्यात पैसे शिल्लक नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अशा ग्राहकांचे बँक अकाउंट येत्या महिनाभरात बंद केली जाणार आहेत.
अशा परिस्थितीत, जर तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत एखादे खाते असेल आणि तुम्ही तुमच्या PNB खात्यामध्ये 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार केला नसेल, तर तुम्हाला अशा खात्यांमध्ये लवकरात लवकर व्यवहार करावे लागणार आहेत.
अन्यथा तुमचे पीएनबीचे खाते बंद केले जाऊ शकते. पीएनबी ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. भारतात एकूण 12 सरकारी बँका आहेत आणि यामध्ये पीएनबीचा देखील समावेश होतो.
दरम्यान आता आपण पंजाब नॅशनल बँकेने गेल्या तीन वर्षांपासून व्यवहार न झालेले आणि 0 बँक बॅलन्स असणारे बँक खाते बंद करण्याचा निर्णय का घेतला आहे हे पाहणार आहोत.
गेल्या तीन वर्षांपासून ज्या खात्यात कोणताही व्यवहार झालेला नसेल आणि खात्यातील शिल्लकही शून्य असेल, तर ही खाती एका महिन्याच्या आत निलंबित केली जातील.
या अशा खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी पीएनबीने हे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पीएनबीच्या माध्यमातून अधिकृत अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे.
अधिसूचना जारी करून, PNB ने म्हटले आहे की अशा सर्व खात्यांची गणना 30 एप्रिल 2024 च्या आधारावर केली जाणार आहे. तथापि, डीमॅट खात्यांशी जोडलेली अशी खाती बंद केली जाणार नाहीत.
त्याच वेळी, 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांसह विद्यार्थ्यांची खाती, अल्पवयीन मुलांची खाती, SSY/PMJJBY/PMSBY/APY सारख्या योजनांसाठी उघडलेली खाती देखील निलंबित केली जाणार नाहीत, असे बँकेने आपल्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.