Bank Loan Information : आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज घेतलेले असेल. तसेच काहीजण नजीकच्या भविष्यात कर्ज घेण्याचा तयारीत असतील. जर तुम्ही ही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा नजीकच्या भविष्यात कर्ज घेणार असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे बँका तथा वित्तीय संस्थांनी आपल्या ग्राहकांना अगदी कमी कालावधीत आणि अल्प व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यामुळे अनेक जण विविध कारणांसाठी कर्ज घेत आहेत. कोणी गृह खरदेसाठी गृह कर्ज घेत आहे, तर कोणी कार खरेदीसाठी वाहन कर्ज घेत आहे. शिक्षणासाठी देखील कर्ज घेतले जाते.
याशिवाय काही वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी वैयक्तिक कर्ज काढले जाते. मात्र, जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते कर्ज फेडण्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशावेळी त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी कोणाची असते? असा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज आपण याच संदर्भात बँकेचे काय नियम आहेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवा.
गृह कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर
गृह कर्ज हे लॉंग टर्म साठी असते. 25 वर्ष, 30 वर्ष कालावधीसाठी बँकांच्या माध्यमातून गृह कर्ज मंजूर केले जाते. यामुळे बँकांच्या माध्यमातून कर्ज देताना जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मध्येच मृत्यू झाला तर त्या कर्जाची वसुलीवर कोणताच परिणाम होऊ नये याची देखील काळजी घेतली जाते. बँका कर्ज देताना सदर व्यक्तीच्या जोडीदाराला अर्थातच पती किंवा पत्नीला सह अर्जदार बनवतात आणि मगच कर्ज मंजूर करतात.
असे केल्यामुळे जर एका अर्जदाराचा मृत्यू झाला तर दुसऱ्या अर्जदाराकडून बँकेला कर्ज वसुल करणे सोपे जाते. तसेच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे पुरेशा रकमेची विमा पॉलिसी म्हणजेच इन्शुरन्स आहे की नाही याची देखील तपासणी बँक करत असते. जर समजा कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर याची सर्वप्रथम बँकेला माहिती द्यावी लागते. तसेच जर मयत व्यक्तीच्या खात्यातून कर्जाचे हप्ते कट होत असतील तर यामध्ये बदल देखील करणे अपेक्षित असते.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावर असलेल्या कर्जाचा बोजा कुटुंबियांवर पडू नये यासाठी कर्ज घेताना टर्म पॉलिसी काढण्याचा सल्ला दिला जातो. कर्जाची टर्म पॉलिसी म्हणजेच कर्जाचा विमा जर काढलेला असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर विम्याच्या रकमेतून कर्जाची रक्कम सदर मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना फेडणे शक्य होते. जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या सह अर्जदाराला कर्जफेड करण्यासाठी थोडासा वेळ दिला जातो.
जर समजा मयत व्यक्तीचा पती किंवा पत्नी कर्जफेड करण्यास असमर्थ असतील तर त्यांच्या मुलांना कर्जाची परतफेड करता येते. अशा प्रकरणांमध्ये सदर मुलांचे सिबिल स्कोर चेक करून त्यांना कर्जाचा हप्ता ठरवून दिला जातो. मात्र जर कोणीच कर्जाची परतफेड करत नसेल तर अशा प्रकरणांमध्ये सदर मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार बँकेकडे आहे. मग बँका सदर ताब्यात घेण्यात आलेली मालमत्ता लिलावात विकते आणि त्यातून आपल्या पैशांची वसुली करत असते.
शैक्षणिक कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर
अलीकडे विविध बँका विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करीत आहेत. यासाठी त्यांना अल्प व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पण जर एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्ज घेतलेले असेल आणि कर्ज फेडण्याआधीच त्याचा मृत्यू झाला तर अशावेळी काय होते असा प्रश्न उपस्थित केला जातो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की शैक्षणिक कर्ज देताना बँकेकडून जामीन मागितला जातो.
जामीन असल्याशिवाय शैक्षणिक कर्ज मंजूर होत नाही. विशेष म्हणजे कर्ज मोठ्या रकमेचे असेल तर पालकांची मालमत्ता गहाण ठेवली जाते. जर समजा शैक्षणिक कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अशावेळी जामीनदाराला कर्ज फेडावे लागते. विशेष म्हणजे गरज पडल्यास शैक्षणिक कर्ज घेताना ज्या व्यक्तीची मालमत्ता बँकेकडे गहाण असते ती मालमत्ता देखील बँकेकडून जप्त केली जाऊ शकते.
वाहनासाठी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर
टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा इतर अन्य वाहनांसाठी कर्ज काढलेले असेल आणि कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशावेळी बँका सदर मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना कर्जाची परतफेड करण्यास सांगतात. जर कुटुंबीयांना कर्जाची परतफेड करता येणे अशक्य असेल तर अशावेळी सदर वाहन जप्त केले जाते आणि त्याचा लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल करण्याचा बँकेचा प्रयत्न असतो.
पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डवर कर्ज काढलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर
एखाद्याने वैयक्तिक कर्ज घेतले असेल किंवा क्रेडिट कार्डवर कर्ज काढले असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशा प्रकरणांमध्ये बँकेकडे कर्ज वसुलीचे पर्याय शिल्लक नसतात. कारण की अशा कर्जात कोणतीच सुरक्षा नसते. जर समजा सदर व्यक्तीचे कुटुंबीय स्वतःहून कर्ज फेडण्यासं इच्छुक असतील तर बँकेचा ताण मिटतो. मात्र बँका कुटुंबीयांना कर्जफेडण्यासाठी भाग पाडू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे कर्ज देताना बँकेच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा विमा आहे की नाही ते चेक केले जाते. जेणेकरून त्यांना विम्याच्या रकमेतून आपला पैसा वसूल करता येईल. मात्र, अशा कर्ज प्रकरणांमध्ये पैशांची वसुली झाली नाही तर ते खाते बँक राईट ऑफ करते म्हणजेच बुडीत खात्यात टाकते.