Banking News : RBI अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारने सन १९३५ मध्ये स्थापित केलेली देशातील एक मध्यवर्ती बँक आणि बँकिंग नियामक संस्था आहेत. ही संस्था देशभरातील बँकेवर नियंत्रण ठेवते. देशातील सर्व बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते.
RBI ने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे आणि नियमाप्रमाणे ज्या बँका कारभार चालवत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होत असते. आरबीआयला ही कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी आहे.
यानुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआयने देशातील अनेक महत्त्वाच्या सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. काही बँकेचे परवाने देखील आरबीआयने रद्द केले आहेत.
अशातच आता RBI ने आणखी एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, काल अर्थातच 30 नोव्हेंबर 2023 रोजी RBI ने एचडीएफसी बँकेसह देशातील पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
यामध्ये बँक ऑफ अमेरिका, एचडीएफसी बँकेसह तीन सहकारी बँकेचा समावेश आहे. ध्रंगध्रा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, पाटलीपुत्र सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक आणि मंडल नागरीक या 3 सहकारी बँकेवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
RBI किती दंड आकारणार ?
RBI ने दिलेल्या माहितीनुसार, अनिवासी भारतीयांकडून ठेवी स्वीकारण्याशी संबंधित असलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल बँक ऑफ अमेरिका आणि एचडीएफसी बँक या दोन बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या दोन्ही बँकाना प्रत्येकी 10 हजार रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, ध्रंगध्रा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बिहारमधील पाटलीपुत्र सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेला आणि गुजरातमधील अहमदाबादच्या मंडल नागरीक सहकारी बँकेला प्रत्येकी दिड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बँक खातेधारकांवर काय परिणाम होणार ?
RBI ने ही दंडात्मक कारवाई केली असल्याने संबंधित बँकेतील खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण, बँक खातेधारकांनी चिंता करण्याचे काही कारण नसल्याचे जाणकार लोकांनी सांगितले आहे.
याचा खातेधारकांवर काहीही परिणाम होणार नाही. या सदर बँकांनी आरबीआयच्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे.